‘औषधां’च्‍या तपासणीला लागणार तीन महिने?

‘औषधां’च्‍या तपासणीला लागणार तीन महिने?

Published on

पुणे, ता. १३ : विविध जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोल्हापूरच्या ‘विशाल एंटरप्राइजेस’ या पुरवठादारांकडून बनावट औषधांचा पुरवठा झाला आहे. त्‍याच पुरवठादारांकडून ससून रुग्‍णालयाला देखील औषधांचा पुरवठा झाल्‍याचे उघडकीस आले असून, त्‍या संबंधित पाच प्रकारच्‍या औषधांचे नमुने पुण्यातील अन्‍न व औषध प्रशासनाने घेतले असून, ती औषधे बनावट आहेत का चांगले आहेत, हे पाहण्‍यासाठी ते मुंबईतील प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. परंतु, ही तपासणी होण्‍यासाठी तीन महिन्‍यांचा कालावधी लागण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.
दरम्‍यान, ससून रुग्‍णालयात ‘विशाल एंटरप्राइजेस’ने पाच प्रकारच्‍या औषधांचा पुरवठा केला. त्‍यामध्‍ये डायक्‍लॉफिनॅक (वेदनाशामक), मीडिआझोलम (अपस्‍मार व्‍यवस्‍थापन), कॅल्शिअमचे १२० बाटल्‍या सिरप, डेक्‍सामिथॅसोन आणि मिझोप्रोस्‍टॉलची औषधे व गोळ्या आल्‍या आहेत. ‘विशाल एंटरप्राइजेस’कडून ही औषधे आल्‍याचे समजल्‍यानंतर ‘एफडीए’च्‍या अधिकाऱ्यांनी ससून रुग्‍णालयाच्‍या औषध भांडार विभागाला गुरुवारी भेट दिली आणि त्‍याचे नमुने ताब्‍यात घेतले.

बनावट औषधांची पाळेमुळे राज्‍यभर?
याआधी कोल्‍हापूर, नागपूर, ठाणे, वर्धा येथील शासकीय रुग्‍णालयांत बनावट औषधांचे रॅकेट उघडकीस आले होते. तर नुकतेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या बीडमधील अंबाजोगाईतील ‘स्‍वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालयात’देखील या औषधांचा पुरवठा झाल्‍याचा प्रकार उघडकीस आला. अंबाजोगाईमध्‍ये बनावट व अप्रमाणित ‘ॲझिथ्रोमायसिन-५००’ व ‘ॲमॉक्‍स’ या प्रतिजैविक औषधांचा पुरवठा झाला होता. त्‍यांना ‘विशाल एंटरप्राइजेस’ने औषधांचा पुरवठा केला होता. या औषधांनी नागरिकांना कोणताही विपरीत त्रास झाला नसला, तरी त्‍याचा परिणामही झाला नव्‍हता.

महाराष्ट्र राज्यातील बनावट व बोगस औषध पुरवठ्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, त्‍या बनावट औषधांचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरवठा करून महाराष्ट्राचा जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. कोणत्याही दोषी आढळणाऱ्या आणि या घोटाळ्यांमध्ये हात असणाऱ्या कोणीही बडी आसामी असो किंवा अधिकारी असो, त्यांच्यावर खटले दाखल झालेच पाहिजेत.
- शरत रामण्णा शेट्टी, रुग्‍ण हक्‍क कार्यकर्ते

मी ससून रुग्णालयास सरकारी रुग्‍णालयांत जाऊन औषधे घेत असतो. परंतु, आता जे बनावट औषधांचे प्रकरण घडले आहे, त्‍यावरून ही औषधे खरी आहेत का, अशी शंका येते. ही बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्‍यांच्‍या संचालकांना अटक झाली पाहिजे. आरोग्‍य विभागाने याच्‍या मुळापर्यंत जाऊन हे रॅकेट उद्धस्त करावे.
- प्रताप जाधव, रुग्‍ण

वादग्रस्त ‘विशाल एंटरप्राइजेस’ या पुरवठादारांकडून ससूनला सुमारे ८० हजार रुपयांच्या गोळ्या व औषधे प्राप्त झाली होती. ती औषधे सील केली आहेत. पुरवठादाराचे बिलही थांबवले आहे. ही औषधे अंबाजोगाई प्रकरणातील ज्‍या कंपन्‍यांनी बनवले आहेत, त्‍यांच्‍याशी संबंधित नव्हती. तरीही सतर्कता आणि खबरदारीचा उपाय म्हणून औषधांचा साठा वितरित करणे थांबवले आहे.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्‍ठाता, ससून रुग्‍णालय

औषधांच्‍या तपासणीबाबत ससून रुग्‍णालयाकडून पत्र मिळाले असून, त्‍यानुसार गुरुवारी औषधांची तपासणी केली. यात इतर जिल्ह्यांत जे बनावट स्‍वरूपाचे औषधे आढळले व ज्‍या वादग्रस्‍त कंपन्‍यांनी ते तयार केले होते, ती औषधे इथे आली नसली, तरी खबरदारी म्‍हणून त्‍या औषधांचे नमुने तपासणी करण्‍यासाठी मुंबईतील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. त्‍यांचा अहवाल येण्‍यास तीन महिने लागण्‍याची शक्‍यता आहे.
- दिनेश खिंवसरा, सहाय्यक आयुक्‍त, एफडीए, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com