यावेळी सूटतील का पर्वतीमधील समस्या?
गुन्हेगारीसह अनेक समस्या केव्हा सुटणार?
पुणे, ता. १३ : पर्वती विधानसभा मतदारसंघात सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यमवर्गीय आणि कष्टकरी असे दोन्ही प्रकारचे वर्ग येथे आहेत. त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. निवासी जागा तसेच झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, वाढती गुन्हेगारी, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, आरोग्य सेवांची कमतरता अशा समस्या सुटणार का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
पर्वती आणि त्यावरील पेशवेकालीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा हे मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. यासोबत तळजाई टेकडीही आहे. सातारा रस्त्यापासून सिंहगड रस्त्यादरम्यानचा परिसर यात समाविष्ट होतो. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, आनंद विहार, दत्तवाडी, दांडेकर पूल, जनता वसाहत हा परिसर आहे. पूर्व भागात सहकारनगर, पर्वती, घोरपडे पेठ, लक्ष्मीनगर, मुकुंदनगर, पर्वती दर्शन, गुलटेकडी, मार्केटयार्ड, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, पद्मावती, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर असा भाग येतो. या परिसरात मोठमोठ्या सोसायट्या आहेत. आंबिल ओढ्यालगतही लोकवस्ती आहे.
झोपडपट्ट्यांचा विकास ही सर्वांत मोठी गरज आहे. जनता वसाहतसारखी शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी येथेच आहे. तेथे ९० एकर जागेत सुमारे १२ ते १५ हजार कुटुंबे राहतात. तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी त्यांना इंदिरानगर, अप्पर-सुपर येथे घरे देण्यात आली होती, परंतु त्यास १०० टक्के यश आले नाही. तीच समस्या इतर झोपडपट्ट्यांची आहे. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) प्रयत्नशील आहे. मात्र त्यास अद्याप अपेक्षित यश आले नसल्याने गुन्हेगारी प्रमाणही जास्त आहे. आरोग्य, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ता अशा समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
आंबिल ओढ्याच्या बाजूला राहत असलेल्या वस्त्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवितहानीसह वित्तहानी होते. टांगेवाला कॉलनी, सहकारनगर, तावरे कॉलनी, मोरे वस्ती, दांडेकर पूल, आंबिल ओढा या परिसरात पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले होते. यात ओढ्याच्या दुतर्फा असलेल्या सीमाभिंती उद्ध्वस्त झाल्या. त्या बांधण्यासाठी व अन्य कामांसाठी मोठा खर्च करण्यात आला, परंतु सीमाभिंतीचे काम अर्धवट राहिले आहे. झोपडपट्टीच्या जुगार अड्डे, मटका असे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. गावठी दारू यामुळे तरुणवर्ग कमी वयात व्यसनाधीन झाल्याने गुन्हेगारीकडे वळत आहे. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची गरज आहे.
याशिवाय पानशेत पूरग्रस्तांच्या घरांबाबत अनेक अडचणी आहेत. पानशेतच्या पुरानंतर विस्थापित नागरिकांचे सहकारी सोसायट्यांद्वारे पुनर्वसन केले गेले. परंतु अनधिकृत सभासद, सोसायटीचे सभासदत्व सभासदाने परस्पर बदलणे, अनोंदणीकृत दस्तांचे हस्तांतरण, बिगर पूरग्रस्त सभासद अशा समस्या आहेत. अनधिकृत हस्तांतरण, पूरग्रस्त सभासदाने दुबार लाभ अथवा दोन घरे घेतल्याबाबत अनेक तक्रारी आहेत.
सिंहगड रस्त्यावरील कोंडी संपणार?
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून सूरू आहे. त्यामुळे या आणि जुना व नवा कॅनॉल अशा रस्त्यांवरून वाहने सुसाट धावतात. या रस्त्यांवर कोंडी होते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा रोजचा सामना करावा लागतो. ही कोंडी संपावी लवकर संपावी, अशी मागणी आहे. सातारा रस्त्यावरही हीच समस्या आहे.
ही विकासकामे बाकी...
स्वारगेट-कात्रज मेट्रो, खडकवासला-खराडी मेट्रो, गंगाधाम चौकात रस्ता विभाजक, बिबवेवाडीतील ५०० खाटांचे रुग्णालय, डावा कालवा भूमिगत करणे, त्या जागेवर जॉगिंग पार्क उभारणे यांसह इतर विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये बिबवेवाडी जुन्या हद्दीतील सर्व सुधारित विकास आराखड्यानुसार २०१७ मधील निवासी जागा (अस्तित्वातील वस्ती, घरे) ईपी १६९ स्थगिती उठवून पुनर्वसन व पुनर्विकास करणे हा हिलटॉपचा प्रश्न कायम आहे. पर्वतीवर रोप-वे करण्याचा प्रस्ताव बारगळलेला आहे.
........
या आहेत ठळक समस्या ः
१. सिंहगड रस्ता व सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवणे
२. पुरप्रवण क्षेत्रात असलेल्या आंबिल ओढ्यालगतच्या वस्त्या, एकता नगरी यांचे पुनर्वसन, सीमा भिंत बांधणे
३. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी इमारतींची उंची २१ मीटरवरून ४०
मीटर करणे
४. गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान
५. बिबवेवाडीतील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

