‘सरस्वती यंत्रा’चे चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम

‘सरस्वती यंत्रा’चे चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम

Published on

पुणे, ता. १३ : पुस्तकांच्या वापरातून ‘सरस्वती यंत्रा’ची प्रतिकृती साकारत नवा विश्वविक्रम शुक्रवारी नोंदविण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाल्याची अधिकृत घोषणा संबंधित अधिकाऱ्यांनी केली. यंदाच्या या महोत्सवातील हा पहिला विश्वविक्रम नोंदविला गेला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून (ता. १४) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत आहे. या निमित्ताने विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. आनंद काटीकर, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वेर्लेकर उपस्थित होते. विश्वविक्रमी कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला.
वाघ म्हणाल्या, ‘‘पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सरस्वतीचे पूजन करण्याचा मान मिळाल्याचा आनंद आहे. वाचनाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. हा महोत्सव केवळ पुण्यात न करता सर्व जिल्ह्यांमध्ये झाला पाहिजे.’’
पांडे म्हणाले, ‘‘पुणेकरांचे पुस्तकांवर किती प्रेम आहे, हे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येते. यंदा पुस्तक महोत्सवाबरोबरच साहित्य, खाद्य, सांस्कृतिक महोत्सव, बालचित्रपट महोत्सव होणार आहे. यंदाच्या महोत्सवात पाच विश्वविक्रम नोंदवले जाणार आहेत.’’

विश्वविक्रमासाठी संबंधित कलाकृती किमान एक हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृतीचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार साकारलेली कलाकृती विश्वविक्रमासाठी पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, असे पटेल यांनी सांगितले.
- प्रवीण पटेल,
अधिकारी, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

चांगल्या गोष्टी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ऑस्ट्रेलियाने लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. मुलांची दिशाभूल होणारे साहित्य मोबाईलवर येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार डीपफेकविरोधात कायदा करत आहे. मात्र, मुलांच्या मोबाईल वापराबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- डॉ. नीलम गोऱ्हे,
उपसभापती, विधान परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com