पुणे मॅरेथॉनसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज
पुणे, ता. १३ : ‘सकाळ’ने सुदृढ पुण्यासाठी आयोजित केलेल्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. रविवारी (ता. १५) २१ हजारांपेक्षा जास्त पुणेकर धावणार आहेत. स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
रविवारी पहाटे पाच वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात विविध शर्यतींना प्रारंभ होईल. २१ किलोमीटर, १० किमी, पाच किमी आणि तीन किमी अशा गटांमध्ये स्पर्धा होईल. ‘सकाळ’च्या पुढाकाराने २०१८ पासून सुरू झालेल्या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे. यंदाही पुणेकर धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. ‘एम्स’ (एआयएमएस) या मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेची स्पर्धेला मान्यता आहे.
ही स्पर्धा जागतिक दर्जाची असल्याने सुरवातीपासून शेवटपर्यंत धावपटूंना विनाअडथळा धावता यावे म्हणून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल ते राजभवन या मार्गावर ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे महापालिकेने विशेष सहकार्य करीत सहभागही नोंदविला आहे. याशिवाय पुणे पोलिसांनी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील धावपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनाही विशेष प्राधान्य दिले जाते. बक्षीस रक्कम केवळ भारतीय खेळाडूंनाच दिली जाते. यावर्षी ३० लाख रुपयांहून जास्त रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात येईल.
--
आज एक्स्पो
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना शनिवारी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बीब आणि टीशर्टचे वाटप करण्यात येईल. धावण्यासाठी उपयुक्त उत्पादने तयार करणाऱ्या विविध कंपन्यांचे स्टॉलही खास आकर्षण असेल.
--
मोहोळ यांची उपस्थिती
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन होईल. याशिवाय पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, क्रीडा आयुक्त सूरज मांढरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
---
पोलिसांसाठी खास करंडक
पोलिस बांधवांसाठी दिला जाणारा ‘पोलिस कमिशनर कप’ हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य आहे. यासाठी राज्यभरातून पोलिस धावपटू मोठ्या संख्येने सहभागी होतात. या वर्षीही गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत विविध जिल्ह्यांतील पोलिस धावपटू सहभागी होतील.
--
शाळांचा सहभाग
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध शाळांचे विद्यार्थीही सहभागी होतील. पुणे महापालिका शिक्षण मंडळ, पुणे अंधशाळा, येरवडा बालग्राम, ज्ञानप्रबोधिनी, सैनिक स्कूल, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सेंट मेरीज महाविद्यालय अशा विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. याशिवाय विविध ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब, तनिष्का सदस्या, ‘यीन’चे सदस्यही सहभागी होत आहेत. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गावर दोन्ही बाजूला स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी ढोल, लेझीम पथक तसेच इतर पथके स्पर्धेची रंगत वाढविणार आहेत.
----
पुणे हाफ मॅरेथॉन ही पुणेकरांसाठी आरोग्यपूर्ण मेजवानी असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज धावणे आवश्यक आहे. ही स्पर्धा धावण्यासाठी प्रोत्साहन देण्यास उपयुक्त आहे. या स्पर्धेला पुणे पोलिसांचे विशेष सहकार्य राहणार आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे.
-----
‘सकाळ’ दरवर्षी मोठ्या दिमाखात मॅरेथॉनचे आयोजन करते. पुणेकर आणि ‘सकाळ’ हे आगळेवेगळे नाते आहे. ‘सकाळ’ पुणेकरांसाठी नेहमीच दर्जेदार उपक्रम राबविते. सुदृढ आरोग्यासाठी मॅरेथॉन आवश्यक आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक
राज्यमंत्री
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

