

पुणे, ता. २७ : अंधारावर प्रकाशाने मात करण्याचा, लखलखत्या दिव्यांचा, दिव्य तेजाचा आणि अपार आनंदाचा सण असणाऱ्या दिवाळीला सोमवारपासून (ता. २८) प्रारंभ होत आहे. सुखाची अन् आनंदाची चाहूल घेऊन येणाऱ्या या दीपोत्सवानिमित्त उत्साहाला उधाण आले असून, सारे शहर या सणासाठी सज्ज झाले आहे.
दिवाळी हा सण म्हणजे साऱ्या सणांचा जणू कळसाध्याय. दसरा संपल्यानंतर दिवाळीची चाहूल लागते आणि सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागतात. दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून आणि फराळाच्या पदार्थांच्या साथीने दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदाही दसऱ्यानंतर दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजायला लागल्या होत्या.
कुतूहलयुक्त डोळ्यांनी आणि अमाप उत्साहाने दिवाळीच्या सणासाठी नानाविध वस्तूंची खरेदी करणाऱ्या नागरिकांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते फुलले होते. पणत्या, आकाशकंदील, कपडे आदींच्या खरेदीमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल पाहायला मिळाली. रविवारी (ता. २७) दिवाळी सुरू होण्यापूर्वीचा अखेरचा सुट्टीचा दिवस असल्याने बाजारांमध्ये मोठी झुंबड पाहायला मिळाली. नागरिकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला.
यंदा चार दिवसांची दिवाळी
रमा एकादशीला दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो. यंदा रमा एकादशी आणि वसुबारस सोमवारी (ता. २८) एकत्र आहे. त्यामुळे या दिवसापासून दिवाळीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर धनत्रयोदशी मंगळवारी (ता. २९) आहे. नरक चतुर्दशी ही गुरुवारी (ता. ३१), लक्ष्मीपूजन शुक्रवारी (ता. १ नोव्हेंबर), दिवाळी पाडवा शनिवारी (ता. २ नोव्हेंबर) आणि भाऊबीज रविवारी (ता. ३ नोव्हेंबर) आहे. त्यामुळे यंदा दिवाळी चार दिवसांची आली आहे, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
वर्षभरातील इतर सण-उत्सवांप्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात राहायचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे आदी गोष्टी केल्या जातात. त्यामुळे या काळात गोडधोडाचे भोजन करून आनंदी वातावरणात राहावे.
- मोहन दाते, पंचागकर्ते
यंदाच्या दिवाळीतील महत्त्वाचे दिवस
रमा एकादशी, वसुबारस : २८ ऑक्टोबर
धनत्रयोदशी, यमदीपदान : २९ ऑक्टोबर
नरक चतुर्दशी : ३१ ऑक्टोबर
लक्ष्मीपूजन : १ नोव्हेंबर
बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा : २ नोव्हेंबर
भाऊबीज : ३ नोव्हेंबर
लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरला
यंदा १ नोव्हेंबरला सूर्योदयापासून दिवसभर असलेली अमावास्या सूर्यास्त झाल्यावर संपूर्ण भारतात कमी-अधिक काळ आहे. ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करावे, असे सांगितले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळजवळ १०० पेक्षा अधिक पंचांगांत आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्येही १ नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजन दिले आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम करून घेऊ नये. यंदा लक्ष्मीपूजनासाठी दुपारी ३ ते ५.१५, सायंकाळी ६ ते ८.३० आणि रात्री ९.१० ते १०.४५ वाजेपर्यंत मुहूर्त आहे, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.