महानिर्मिती आता वीज वितरण क्षेत्रातही

महानिर्मिती आता वीज वितरण क्षेत्रातही

Published on

पुणे, ता. १ : औष्णिक विद्युत उत्पादन क्षेत्रातील महानिर्मिती कंपनीने वीज उत्पादनासोबतच वीज वितरण क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धुळे जिल्ह्यातील महानिर्मितीच्या २५ मेगावॅट स्थापित क्षमतेच्या साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्पातील वीज १५ मेगावॅट वीज हडपसर व मांजरी येथील एस. ई. झेडला वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मेसर्स बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (वीज वितरण परवानाधारक) यांच्या समवेत महानिर्मितीकडून करार करण्यात आला आहे.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, वित्त संचालक बाळासाहेब थिटे, प्रकल्प संचालक अभय हरणे, सौर ऊर्जा मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे, महाव्यवस्थापक हर्षल भास्करे तर एस. ई. झेड. बायोटेकतर्फे (सायरस पूनावाला ग्रुप) कार्यकारी संचालक केदार गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना येरमाळकर (इरो पॉवर) यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
महानिर्मितीतर्फे प्रथमच खासगी वीज वितरण परवानाधारक संस्थेसमवेत हा वीज खरेदी करार करण्यात आला आहे. महानिर्मितीने मांजरी एस. ई. झेड येथे ६ मेगावॅट आणि हडपसर एस. ई. झेड येथे ९ मेगावॅट वितरण करण्याकरिता निविदा स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये महानिर्मितीची निविदा पात्र ठरली आहे. त्यामुळे मेसर्स एस. ई. झेड. बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या मांजरी आणि हडपसर येथील दोन्ही एस. ई. झेड. करिता महानिर्मितीकडून वीज विक्री केली जाणार आहे. हा करार संपन्न करण्यासाठी एस. ई. झेड. बायोटेक (सायरस पूनावाला ग्रुप) तर्फे इरो पॉवर या वितरण प्रणाली ऑपरेटर कंपनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एस. ई. झेड. बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हा मांजरी आणि हडपसर या दोन्ही एस. ई. झेडचा विकसक असून येथे सिरम इन्स्टिट्यूटसारख्या अग्रगण्य लस उत्पादक कंपन्या स्थित आहेत.
वाढते औद्योगिकीकरण, लोकसंख्या, तापमान वाढ आणि निसर्गाची अवकृपा लक्षात घेता महानिर्मितीने औष्णिक वीज उत्पादनाकडून आता नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात २०३०पर्यंत ८ हजार मेगावॅट प्लस क्षमता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, उदंचन जल विद्युत प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, कोल गॅसिफिकेशन, सरकुलर इकॉनॉमीसारख्या अभिनव उपक्रमांना गती देण्यासाठी महानिर्मिती प्रयत्नशील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.