हरी मुखे म्हणा ! हरी मुखे म्हणा !!

हरी मुखे म्हणा ! हरी मुखे म्हणा !!

पुणे, ता. १ ः संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. लाखो पुणेकरांनी सोमवारी दिवसभर रांगेत थांबून कुटुंबासह दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी अन्नदानापासून विविध उपक्रम राबवत पुणेकरांनी विठ्ठलचरणी आपली सेवा रुजू केली. पालखीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेल्या भवानी पेठ व नाना पेठेत वारकऱ्यांसह शहरातील नागरिकांनीही खरेदीचा आनंद लुटला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी रविवारी रात्री नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी होती. सोमवारी पहाटे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुकांची महापूजा सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते झाली, तर संत तुकाराम महाराज पादुकांची श्री निवडुंगा विठोबा मंदिर ट्रस्टच्या दीपक मानकर, अक्षय भोसले, सीताराम गोळे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर दोन्ही मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली.

असे झाले दर्शन
- पुणे शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी बाहेर रांगा
- दर्शन रांगेत गडबड, गोंधळ होऊ नये, यासाठी बॅरिकेडस्‌ लावून महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था
- दर्शनासाठी वेळ लागत असला तरीही दर्शन सुरळीत होत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान
- बहुतांश नागरिक दर्शनासाठी कुटुंबीयांसमवेत दाखल
- अनेक महिला, तरुणींनी खास नऊवारी साडी केली परिधान
- लहान मुले दर्शनासाठी वारकरी, विठ्ठल, रुक्मिणीच्या वेशभूषेत
- सेवाभावी संस्था, राजकीय पक्षांकडून रांगेत थांबलेल्या नागरिकांना फराळाचे वाटप
- वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांकडून पालखी मुक्कामाच्या परिसरात कडक बंदोबस्त
- चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर

पुणेकरांच्या सहभागाने वाढला उत्साह
प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनीही संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. प्रत्येक दिंड्यांमध्ये सकाळी काकड आरती व सायंकाळी हरिपाठ संपन्न झाला. वारकरी दिवसभर भजन-कीर्तनामध्ये दंग झाले होते. वारकऱ्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळण्याचाही आनंद लुटला. अनेक नागरिकांनी वारकऱ्यांसमवेत खेळांमध्ये सहभागी होत, त्यांचा उत्साह वाढविला. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे समूहदेखील दर्शनानंतर पालखी परिसरात फिरण्याचा आनंद घेत होते. वारकऱ्यांना शहरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, बागा, उद्याने, प्राणिसंग्रहालयाची माहिती देत होते. त्यांच्यासह मोबाईलमध्ये सेल्फी घेण्यासही तरुण विसरले नाहीत. नाना पेठेतील मुख्य चौकात संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे शिल्प साकारण्यात आले होते. तेथेही दर्शनासाठी गर्दी झाली होती.

पुणेकरांकडून विठ्ठल चरणी सेवा रुजू !
आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांचा पुणेकरांनी प्रथेप्रमाणे पाहुणचार केला. स्वादिष्ट भोजनासह वारकऱ्यांना चप्पल, कपडे, पिशव्या शिवून देणे, केस कापणे, पायांना मसाज करण्यापासून त्यांना वारीसाठी फराळाचे पदार्थ, बिस्किटे देण्यात आली. अनेक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळे, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, कंपन्या, व्यापारी वर्गाने वारकऱ्यांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था केली होती.

दरवर्षी आम्ही पालखी सोहळ्यात सहभागी होतो. या वर्षीही पायी पंढरपूर वारी करण्यासाठी आम्ही १० ते १५ जण आलो आहोत. वारीतून पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा आनंद वेगळा आहे. पुण्यात सगळ्या सोईसुविधा मिळतात. इथे खूप आनंदाने पाहुणचार केला जातो.
- किरण वानखेडे, चंद्रपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com