पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी ‘सर्किट ब्रेकर’

पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी ‘सर्किट ब्रेकर’
Published on

पुणे, ता. २ : पावसाळ्यात घर, दुकान, सोसायट्या व इतर वास्तुमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून अपघात होत आहेत. त्यामागे प्रामुख्याने ग्राहकांकडील अंतर्गत वायरिंगमधील करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर, अर्थिंग नसणे हे कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वस्तूंमध्ये ‘सर्किट ब्रेकर’ लावण्यात यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.
वीजसंच मांडणीमध्ये विजेचा धोका टाळण्यासाठी योग्य ‘अर्थिंग’ अत्यावश्यक आहे. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. वीजपुरवठा तत्काळ खंडित होणे आवश्यक आहे. यासाठी घर, सोसायट्या किंवा इतर वास्तूमध्ये सर्किट ब्रेकर जसे की, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ईएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्किट ब्रेकर (एमसीबी) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे.
विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्टसर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारापासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्किट ब्रेकरकडून वीजप्रवाह खंडित केला जातो. हा सर्किट ब्रेकर साधारणतः दोन हजार ते तीन हजार रुपये किमतीत मिळतो. सर्किट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे गरजेचे असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

विद्युत टेस्टर म्हणजे लाइफ सेव्हर...
बाजारात सुमारे २० ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या विद्युत टेस्टरमुळे वीज अपघाताचे धोके टाळता येतात. ओल आलेल्या भिंतीला, टिनपत्र्याला, कपडे वाळत घालायच्या लोखंडी तारेला, फ्रिज, टिव्ही, संगणक, गिझर किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील तसेच ओलसर लोखंडी पाइप, कृषिपंपाची पेटी, पाण्याच्या मोटार पंपांना स्पर्श करण्यापूर्वी विद्युत टेस्टरने त्याची तपासणी करावी. पायात रबरी किंवा प्लास्टिक चप्पल वापरावी, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.