ग्रामपंचायत स्तरावर आता 
‘कौशल्य विकास केंद्र’

ग्रामपंचायत स्तरावर आता ‘कौशल्य विकास केंद्र’

Published on

पुणे, ता. २ : ‘‘कौशल्य विकासात राज्य अग्रेसर राहावे, युवकांनी कौशल्य आत्मसात करावे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्याने ‘कौशल्य विकास केंद्र’ स्थापन करण्यात येतील. या केंद्रांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,’’ अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी (ता. २) दिली.
आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत आयोजित ‘कौशल्य विकास दिंडी’चा शुभारंभ लोढा यांच्या उपस्थितीत वानवडी येथे झाला. ‘कुशल महाराष्ट्र-रोजगार युक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित ही दिंडी आहे.
या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते. दिंडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) पाच हजार विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना, उपक्रम राबविले जातात, याची माहिती वारीतील वारकऱ्यांना आणि नागरिकांना व्हावी, या उद्देशाने ही दिंडी काढण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. भैरोबा नाला ते गाडीतळपर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.