

पुणे, ता. २ : क्रिकेट खेळताना वाद झाला म्हणून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगणाऱ्या महिलांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या टोळक्याने महिलांशी अश्लील वर्तनही केले. रविवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास येरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मैदानाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसेन अस्लम खान, आमीर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जॉन्सन शिरसाट (सर्व रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ५१ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
रविवारी येरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मैदानात आरोपी क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना आरोपींचा विल्सन मारिअन याच्याशी वाद झाला. वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिला, तिची छोटी बहीण, तसेच हरिश बबन काळे, यशवंत बबन काळे भांडणे सोडविण्यासाठी गेले.
आरोपी आमीर खान याने घरातून कोयता आणि कुकरी आणली. आरोपींनी हरिश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली. यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक तुषार दोडमिसे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.