‘साथ चल’च्या वारीत रंगला आनंदसोहळा

‘साथ चल’च्या वारीत रंगला आनंदसोहळा

Published on

पुणे, ता. २ ः पहाटेचा आल्हाददायक गारवा, सोबतीला पावसाच्या हलक्या सरी, हरिनामाचा जयघोष अशा चैतन्याने भारलेल्या वातावरणात आबालवृद्धांनी मंगळवारी आनंदसोहळा साजरा केला. वारकऱ्यांसह भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या पुणेकरांच्या उत्साहाला उधाण आले होते.
‘सकाळ’तर्फे पूलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानकावर झालेल्या ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होत पुणेकरांनी जणू आषाढी वारीत सहभागी होता न आल्याची खंत दूर केली. धोतर, कुर्ता, टोपी अशा वेशात पुरुष आणि नऊवारी, नथ अशा वेशात महिला सजल्या होत्या. कपाळी चंदनाचा टिळा आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत सारे ‘विठ्ठल’ या एका ध्वजाखाली एकत्र आले होते. विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या सदस्यांसह सर्वसामान्य पुणेकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पथनाट्यातून जनजागृती
जलसंवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या वेळी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी आणि बी. आर. घोलप महाविद्यालय, सांगवी या महाविद्यालयातील सकाळ ‘यिन’च्या सदस्यांनी पथनाट्य सादर केले. पाणी जपून वापरा, नदी स्वच्छ ठेवा, असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. शिवम नडगिरी, कादंबरी देसाई, वैष्णवी मेढे, शबरी कुलकर्णी, समृद्धी धुमाळ, स्वराज चेडे, वैष्णवी शिर्के, ऋतुजा दिवेकर, सुयश मोरडे, रिया गायकवाड, पूजा सावंत या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पथनाट्यात सहभाग घेतला.

अभिनेत्रींनी धरला फेर
‘साथ चल’ उपक्रमात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, नूपुर दैठणकर, प्रतीक्षा जाधव, अंकिता लांडे या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. शपथ घेतल्यानंतर उपस्थितांसमवेत दिंडीत सहभागी होण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही. डोक्यावर तुळशी वृंदावन घेत मृदंगाच्या तालावर त्यांनी दिंडीत फेर धरला, फुगड्याही खेळल्या.

हास्ययोगातून ऊर्जानिर्मिती
नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अनेक सदस्य ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी झाले होते. या वेळी परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी हास्ययोगाची प्रात्यक्षिके घेत ऊर्जादायी वातावरण निर्माण केले.

शंखनादाने पसरले चैतन्य
केशव शंखनाद पथकाने या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. टोपी, जॅकेट, कपाळी टिळा अशा गणवेशात पथकाचे सारे सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यांनी एकत्रितपणे केलेल्या शंखनादाने वातावरणात अनोखे चैतन्य पसरले.

जलसंवर्धनाची दिंडी
कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची ही संस्था उपक्रमात सहभागी झाली होती. संस्थेच्या सदस्यांनी या वेळी संस्थापक-अध्यक्ष रवींद्र महाराज गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली जलसंवर्धनासाठी दिंडी काढली. या दिंडीत उपस्थित भाविकांनीही सहभाग घेत ठेका धरला आणि फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.