प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या 
टोळीला पोलिसांकडून अटक

प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

Published on

पुणे, ता. २ ः शहरातील पीएमपी, एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १२० मोबाईल, तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
इम्रान ताज शेख (वय ३१ रा. अश्रफनगर, कोंढवा), ऊसामा शफीक शेख (वय २२ रा. सय्यदनगर, हडपसर) आबिद मुकीम पटेल (वय २३) अख्तर अली रबियल खान (दोघे रा. मालाड, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांत स्वारगेट येथील एसटी आणि पीएमपी स्थानक परिसरातून प्रवाशांकडील मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे आणि उपनिरीक्षक अशोक येवले यांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी इम्रान शेख स्वारगेट स्थानकात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने स्वारगेट परिसरात १०० ते १५० मोबाईल चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या मोबाईलची त्याने ऊसामा शेखला विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी ऊसामाला ताब्यात घेतले असता, त्याने मोबाईल फॉरमॅट करून मुंबईतील विक्रेते अबिद पटेल, अख्तर अली खान यांना विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पटेल आणि खान यांना मुंबईतून ताब्यात घेतले.
चोरट्यांकडून १२० मोबाईल संच, तीन लॅपटॉप असा १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, हर्षल शिंदे, फिरोज शेख, सुजय पवार, संदीप घुले यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.