शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

Published on

पुणे, ता. २ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) याचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या देखील परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण आठ लाख ९२ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील एक लाख ७८ हजार ७४५ विद्यार्थी पात्र ठरले असून ३१ हजार ३९४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतरिम निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला. या अंतिम निकालावरून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वैयक्तिरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे. तसेच शाळेस त्यांच्या लॉगिनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बॅंक खात्याची आणि आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्यांना स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार पाहता येणार आहे. तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेचे छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविले जाईल, असेही परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात
तपशील : इयत्ता पाचवी : इयत्ता आठवी
नोंदणी केलेले : ५,१०,६७२ : ३,८१,५८८
उपस्थित विद्यार्थी : ४,९२,३७३ : ३,६८,५४३
अनुपस्थित विद्यार्थी : १८,२९९ : १३,०४५
पात्र विद्यार्थी : १,२२,६३६ : ५६,१०९
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : १६,६९१ : १४,७०३

गुणवत्ता यादीत याचा नसेल समावेश
- शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी
- मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षा दिलेले विद्यार्थी
- कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी
- परीक्षेतील गैरप्रकारता समाविष्ट विद्यार्थी
- अर्ज न भरता परीक्षेस एनवेळी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.