‘एनआयव्ही’ करणार झिकाचे जनुकीय क्रमनिर्धारण

‘एनआयव्ही’ करणार झिकाचे जनुकीय क्रमनिर्धारण

Published on

पुणे, ता. २ : पुण्यात वेगाने पसरणाऱ्या झिका विषाणूच्या संसर्गामुळे महापालिकेची काळजी वाढली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूप्रमाणेच झिकाचेही जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (एनआयव्ही) यासाठी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
झिकाच्या विषाणूंमध्ये काही बदल झाला आहे, त्यांच्या संसर्गाच्या वाढीमागे नेमकी कोणती कारणे आहेत, तो आशियातील देशांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंप्रमाणेच आहे का, की इतर देशांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंप्रमाणे आहे, या प्रश्नांची उत्तरे जनुकीय क्रमनिर्धारणातून मिळतील, अशी माहिती मिळाली आहे. शहरातील मुंढवा, एरंडवणा आणि डहाणूकर कॉलनी या भागात आतापर्यंत झिकाचे रुग्ण आढळले आहेत. शहरात झिकाचे एकापाठोपाठ एक रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. त्याचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य खाते, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आणि ‘एनआयव्ही’मधील शास्त्रज्ञ यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. त्यात हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.
शहरात आढळलेला एकही झिकाचा रुग्ण परदेशातून प्रवास करून आलेला नाही किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातही कधी आला नाही. त्यामुळे सध्या संसर्ग होणारा झिकाचा विषाणू कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती जनुकीय क्रमनिर्धारणातून मिळाले, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
झिकाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, सर्वेक्षण पद्धत कशी असावी, कोणती काळजी घ्यावी यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.