शिष्यवृत्तीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल

शिष्यवृत्तीत पुणे जिल्हा राज्यात अव्वल

Published on

पुणे, ता. २ ः इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. त्यातही यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या दोन्ही वर्गांच्या मिळून राज्य गुणवत्ता यादीतील पुणे जिल्ह्यातील ११६ पैकी तब्बल १०८ विद्यार्थी हे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत. या १०८ विद्यार्थ्यांमध्ये पाचवीच्या ६० आणि आठवीच्या ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील ६९ विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता यादीत चमकले असून, यापैकी ६० विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांचे आहेत. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ४७ विद्यार्थी चमकले आहेत. यापैकी तब्बल ४० विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
पुणे जिल्ह्यात इयत्ता पाचवीचे एकूण १२०३ विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यापैकी तब्बल ६४६ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. या सर्व संचामध्ये अव्वल ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील ५४ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इयत्ता आठवीचे एकूण १११० विद्यार्थ्यांचा समावेश असून यापैकी ९९ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. शहरी व ग्रामीण गुणवत्ता यादीत पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत खेड आणि शिरूर तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी बाजी मारली असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.