अन्नधान्य, कडधान्यांसाठी  
पीक स्पर्धेचे आयोजन

अन्नधान्य, कडधान्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

Published on

पुणे, ता. ५ : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये चालू खरीप हंगामात विविध ११ पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
ही पीक स्पर्धा सर्वसाधारण (खुला गट) व आदिवासी अशा दोन गटांत घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात यंदाच्या खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक पिकांची पेरणी केलेली असणे अनिवार्य आहे.
या स्पर्धेतील पुरस्कारांचे मानकरी ठरणाऱ्या सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांना पीकनिहाय राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी रोख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ३० हजार रुपयांचे, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्यांना पीकनिहाय प्रत्येकी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांक ५ हजार रुपये आणि तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकास प्रत्येकी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार तर, तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. यासाठी सर्वसाधारण गटासाठी प्रत्येकी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

आवश्‍यक पात्रता
- इच्छुक शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्‍यक
- संबंधित शेतकरी त्याची जमीन स्वत: कसत असला पाहिजे
- एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येईल
- भात पिकाच्या बाबतीत किमान २० गुंठे क्षेत्र अनिवार्य
- अन्य पिकांच्या बाबतीत किमान ४० गुंठे क्षेत्रावर पेरणी आवश्‍यक

आवश्‍यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- अर्जासोबत पीकनिहाय ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- सातबारा व आठ ‘अ’चा उतारा
- जातीचे प्रमाणपत्र (केवळ आदिवासींसाठी)
- पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा उताऱ्यावर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

अधिक माहितीसाठी संपर्क
या योजनेच्या अधिक माहितीसाठी राज्याच्या कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आपापल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.