ऋषितुल्य योगगुरु

ऋषितुल्य योगगुरु

Published on

ऋषितुल्य योगगुरू


डॉ. संप्रसाद विनोद यांच्या योगकार्याची पन्नास वर्षे आणि वयाची पंचाहत्तर वर्षे ८ जुलैला पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून ‘सुवर्ण साधनेचा अमृत योग’ हा कार्यक्रम रविवार (ता. ७ जुलै) आयोजित केला आहे. त्यानिमित्त...
- प्रा. मिलिंद जोशी

एका वृत्तपत्रात बोधिवृक्ष नावाचे सदर मी वर्षभर लिहिले. व्यापक आणि व्यामिश्र वाटणाऱ्या जीवनाच्या काही कंगोऱ्यांना स्पर्श करणाऱ्या काही विचारवेलींचा परामर्श मी या सदरात घेतला. त्या लेखांच्या संकलनातून पाहावे आपणासी आपण हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकाचा आशय पाहता त्याचे प्रकाशन डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते व्हावे असे मला मनोमन वाटत होते. त्यांची भाषणे मी ऐकली होती, वृत्तपत्रातून येणारे त्यांचे लेख मी वाचले होते, पण मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यांचा नंबर मिळवून त्यांची वेळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. पहिल्याच भेटीनंतर त्यांच्याविषयी वाटणारा आदर वाढत गेला.
डोक्यावर बांधलेला पांढरा रुमाल, चेहऱ्यावरचे विलक्षण सात्त्विक भाव, बोलके डोळे, मोजके आणि अर्थपूर्ण बोलणे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व माझ्या मनात ठसले. त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्यांनी व्यक्त केलेले मौलिक विचार श्रोत्यांनीही मनाच्या कुपीत जपून ठेवले. या समारंभानंतर या देवमाणसाशी असणारा माझा स्नेह वाढत गेला. महाराष्ट्र साहित्य परिषदेत ते व्याख्यानासाठी आले, पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले आणि त्यांच्या हस्ते ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या शांती मंदिरात आणि योग परिवारातही मी पुस्तक प्रकाशनाच्या आणि व्याख्यानाच्या निमित्ताने जात राहिलो. या सर्व भेटीत समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे परि तो सद्‍गुरू वेगळाचि दिसे ! या वचनाची आठवण मला येत राहिली.
जीवनाचे वास्तव समजून घेत प्रत्यक्ष जगताना अनेक वाटांवरती माणसांना गुरूंची आवश्यकता असते. शिक्षक अभ्यासक्रमाचे पुस्तक शिकवतात, गुरू जीवन नावाचे पुस्तक समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. माणसांच्या वाट्याला येणारे अनुभव हे देखील गुरुंसारखेच असतात, असे म्हटले जाते. पण त्या अनुभवांची प्रत समजून घेण्यासाठी गुरूच लागतात. स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेत, शिष्यांना सर्वसंग परित्याग करायला लावणारे आणि स्वत: विलासी जीवन जगणारे गुरू जागोजागी भेटतात पण विलक्षण सात्त्विक आणि साधं जीवन जगणारे, स्वत:च्या चिंतनगुंफेत चिंतन केल्यानंतर हाती आलेल्या विचारांतून शिष्यांचे जीवन उजळून टाकणारे आणि बोले तैसा चाले हा मंत्र प्राणपणाने जपणारे डॉ. संप्रसाद विनोद यांच्यासारखे गुरू लाभणे हा साधकांच्या वाट्याला आलेला भाग्ययोगच.

समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणे ही अनेकदा स्वाभाविक गोष्ट असते. पण तो वारसा समर्थपणे पुढे चालविण्यासाठी वारसदारही तेवढ्याच क्षमतेचा असावा लागतो. महर्षी न्यायरत्न विनोद या अर्थाने भाग्यवान त्यांना डॉ. संप्रसाद विनोद यांच्यासारखा समर्थ वारसदार लाभला. डॉ. संप्रसाद विनोद यांनी केवळ योग हा विषय अभ्यासला नाही तर अनुभव येथे व्हावा शिष्टाचार या न्यायाने तो स्वत: अनुभवला आणि आचरणातही आणला. आजकाल स्वयंघोषित योगगुरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना डॉ. संप्रसाद विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचे पावित्र्य जपण्याचे काम शांती मंदिराने केले आहे.
काय शिकावे आणि कसे शिकावे याचा आदर्श वस्तुपाठ डॉ. विनोद यांनी साधकांना घालून दिला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा पुसट होण्याच्या काळात डोळस श्रद्धा निर्मितीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. योगमय जीवनाची महती विशद केली. सत्वसंपन्न जीवन जगण्यासाठी कोणती आचारसंहिता पाळली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. आचार, विचार आणि उच्चारातल्या एकवाक्यतेतून वाट्याला येणाऱ्या सामर्थ्याचा साधकांना परिचय करून दिला.
विद्यापीठांना केवळ पदव्या देण्यात स्वारस्य असते. अनेकदा ज्ञानाचा आणि पदवीचा संबंध असतोच असे नाही. त्यामुळे पदवीधर खूप तयार होतात. पण जाणकार तयार होतातच असे नाही. साधकांच्या संख्येत भर घालण्यापेक्षा त्यांनी योगविद्येतील जाणकार कसे वाढतील यावरती आपले लक्ष केंद्रित केले त्यासाठी त्यांनी केलेल्या तपाला फळ आले. आज त्यांनी निर्माण केलेले योगविद्येतील जाणकार जगभर कार्यरत आहेत. डोळस माणसांकडे केवळ दृष्टी
असते पण डॉ. संप्रसाद विनोद यांच्यासारखे या क्षेत्रातील अधिकारी पुरुष त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला जीवनदृष्टी देतात. त्यांनी दिलेल्या जीवनदृष्टीमुळेच अनेकांचे जीवन आमूलाग्र बदलून गेले आहे. शाश्‍वत आनंदाच्या आणि समाधानाच्या अनेक प्रकाशवाटा त्यांनी अनेकांना दिलेल्या जीवनदृष्टीमुळे गवसल्या आहेत. डॉ. संप्रसाद विनोद यांनी त्यांना अनुभवातून गवसलेले मौलिक विचारधन अनेक ग्रंथातून शब्दबद्ध केले आहे. पुढच्या अनेक पिढ्यांसाठीचा हा अनमोल ठेवा आहे.
आज आपण सारेच गतिमान युगाला सामोरे जात आहोत. का धावायचे? किती धावायचे? याचा विचार न करता नुसते धावत सुटलो आहोत. निखळ आणि निर्मळ आनंद देणारे सर्व काही स्वत:त, स्वत:च्या जवळ असतानाही त्याच्या शोधार्थ वणवण भटकत आहोत. तुझे आहे तुजपाशी ! परि तू जागा चुकलासी ! अशीच सर्वांची अवस्था झाली आहे. अशा काळात मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. संप्रसाद विनोद यांचे काम एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांना अमृतमहोत्सवी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)
30794

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.