‘हरे राम, हरे कृष्णा’चा जयघोष

‘हरे राम, हरे कृष्णा’चा जयघोष

Published on

पुणे, ता. ७ : ‘जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा’, ‘हरे राम, हरे कृष्णा’ अशा जयघोषांनी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ- इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, इस्कॉन संस्थेचे संन्यासी प. पू. कृष्णचैतन्य स्वामी, प्रबोधानंद स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आरती करून रथयात्रेला प्रारंभ झाला. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाची उंची २० फूट होती.
बाजीराव रस्ता, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, ओंकारेश्वर मंदिर, जंगली महाराज रस्ता, टिळक चौकामार्गे पुन्हा स. प. महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. यात्रेमध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते. रथयात्रा समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. जवळपास २० हजार भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.