जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरी पाऊस

जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरी पाऊस

Published on

पुणे, ता. ७ : जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाने सरासरी गाठली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून, कोकण आणि मराठवाड्यात पावसाने जेमतेम सरासरीपर्यंत मजल मारली असल्याची माहिती रविवारी (ता. ७) हवामान विभागाने दिली. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यंदा वेळेआधी पोहचलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) वाटचाल अडखळत झाली. महाराष्ट्रात बरेच दिवस मुक्काम ठोकल्यानंतरही जूनअखेरपर्यंत राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली होती. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहे. त्यामुळे १ ते ७ जुलै या दरम्यान राज्यात सरासरीच्या तुलनेत १३ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. दरम्यान, राज्यात सरासरी ६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो ७६.५ मिलिमीटर (१३ टक्के) पडला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ७ जुलै या कालावधीत सरासरी ११८.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो २२३.७ मिलिमीटर (सरासरीच्या तुलनेत ८९ टक्के) झाला. त्याचवेळी मुंबई आणि उपनगरसह छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, उर्वरित राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

जुलैमध्ये पडलेला पाऊस...
महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथे पावसाने तेथील सरासरी गाठली. मात्र, केरळ आणि ओरिसामध्ये पावसाने ओढ दिली आहे. तेथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असल्याचे चित्र दिसते.

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस...
मध्य महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान ४८.१ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा तो ६३.५ मिलिमीटर (३२ टक्के) पडला. विदर्भात सरासरीच्या तुलनेत ३० टक्के (७६.७ मिलिमीटर) पाऊस पडला आहे. विदर्भ या हवामान उपविभागात सरासरी ५९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. या पेक्षा ३० टक्के जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरी २४२ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा २३०.७ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. तसेच, मराठवाड्यात ३४.६ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३२.३ मिलिमीटर पाऊस नोंदण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.