महावितरणकडून साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक

महावितरणकडून साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ८ : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर वीजग्राहकांना तत्काळ सेवा देण्यासाठी पुणे परिमंडलांतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड शहर, तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे ४ हजार ५७५ अभियंते आणि कर्मचाऱ्यांची महावितरणकडून नेमणूक करण्यात आली आहे.
पावसाळ्यातील नियोजनाबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी आढावा घेतला. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व विभागांतील अभियंते, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. मुसळधार पाऊस व अन्य संबंधित कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा. त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय करावी आणि वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामदेखील वेगाने करावे, अशा सूचना पवार यांनी बैठकीत दिल्या.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना क्षती पोहचल्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा काँक्रीटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्या आहेत. सोबतच रस्त्याची उंची वाढल्यामुळे कडेला असलेले फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. यासोबतच वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हीस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे आदींमुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे.
त्या पार्श्‍वभूमीवर पवार म्हणाले, ‘‘पावसामुळे वीजयंत्रणेतील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तत्परतेने उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बिघाड गंभीर असल्यास संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेग द्यावा. खंडित वीजपुरवठ्याची माहिती ग्राहकांना देण्यासोबतच विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षेबाबत जागरूक राहून यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करावे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.