मी अनुभवलेला पानशेतचा पूर

मी अनुभवलेला पानशेतचा पूर

१२ जुलै १९६२, मी दहावीच्या वर्गात मॉडर्न हायस्कूलला शिकत होतो आणि ज्ञानेश्‍वर वसतिगृहात राहात होतो. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता हायस्कूलमध्ये आलो. पण पटांगणामध्ये आज प्रार्थनेची लगबग दिसत नव्हती. तर व्हरांड्यामध्ये सगळीकडे कपड्यांची आणि भांड्यांची बोचकी बांधण्याची गडबड चालू होती. वर्गात जावे म्हटले, तर मुठा नदीला पूर आला असून, त्यामुळे हायस्कूलला सुट्टी असल्याचे समजले. नदीला पूर आणि सुट्टी असल्याचे समजताच नदीचा पूर पाहण्यासाठी आमची उत्सुकता वाढली. सोबत वर्गमित्र आणि वसतिगृह निवासी तांबे, वाघ होते.
महापालिकेला वळसा घालून आम्ही दगडी पुलावर आलो. तोपर्यंत नदीपात्रातील पत्र्याचे नाट्यगृह आमच्या डोळ्यादेखत पुराबरोबर वाहून गेले. पुराचे पाणी क्षणोक्षणी वाढतच होते. पोलिस काठी आपटत पुलावरून लोकांना निघून जाण्यास सांगत होते. एव्हाना पाणी पुलाला लागल होते. त्यामुळे आम्ही शनिवारवाड्याच्या पूर्व बाजूच्या रस्त्याने बाहेर निघालो. समोरून रस्त्यात पाणी घुसले होते. आम्ही तसेच पाण्यात शिरलो आणि काही पावले चाललो. मात्र, पाण्याचा वेग बघून आम्ही माघारी फिरलो. आम्ही परत पुलावर आलो. सायंकाळचे चार वाजत आले होते. पुरातून बाहेर कसे पडायचे याची वाट आम्ही शोधू लागलो. आमच्याकडे पाहून एक आजी म्हणाल्या ‘‘असेच घराघरांतून जात राहा. पुढे बाहेर पडाल.’’ त्याप्रमाणे कसबा पेठेतील घराघरांतून जात आम्ही शेवटी मेहेरेबाबा चौकात आलो. तेथून पॉवर हाऊसमार्गे ज्ञानेश्‍वर वसतिगृहात आलो, तर समोरच रेक्टर चौधरी सर हातात कंदील व बॅटरी घेऊन उभे असलेले दिसल्याने आम्ही जरा दचकलोच. ‘‘पूर पाहून आलात का,’’ असे त्यांनी विचारताच आम्ही होकार दिला. ‘‘आमची अलका अजून आलेली नाही. तिला फोनही लागत नाही. तिला शोधायला आम्ही निघालो आहोत. तुम्हीही आमच्याबरोबर चला,’’ असे ते म्हणाले. आम्ही चौधरी सरांबरोबर निघालो. आम्ही चौघेजण होतो. मी तांबे, वाघ, चौधरी सर आणि आणखी एक जण. पुणे स्टेशन रेल्वमार्गाने नदीवरील रेल्वेच्या पुलावर आलो. वीज नव्हती. आम्ही तसेच रेल्वे पुलाच्या स्लीपवर घुसलो. जिवात जीव नव्हता. चंद्राच्या प्रकाशात दोन स्लीपरच्या फटीतून खाली पुराचे वाहणारे पाणी दिसत होते.
तेथून इंजिनिअरिंगची वसतिगृहे, फर्ग्युसन कॉलेज, लकडी पूल, टिळक रस्तामार्गे तळ्यातील गणपतीला आलो. पण अलकाचा कुठेही पत्ता लागला नाही. तेथून स्वारगेट पुढे सोलापूर रस्त्याने पूलगेट, इस्ट स्ट्रीट, वेस्टएंड, लाल चर्च, जीपीओ, पांढरे चर्च करीत ज्ञानेश्‍वर वसतिगृहात आलो. पोटात अन्नाचा कण नव्हता. तसेच झोपी गेलो.
सकाळी लवकरच जाग आली. तसाच परत पूर पाहायला बाहेर पडलो. रेल्वे मालधक्का, गाडीतळमार्गे मंगळवार पेठेत आलो. या कमानीच्या पश्‍चिम बाजूला असलेल्या पत्र्याच्या चाळी आणि घरे पुरात वाहून गेली होती. तसाच आत नदीच्या बाजूला गेलो. सगळीकडे गाळच गाळ होता. त्या गाळात सगळीकडे माणसांचे मृतदेह विखुरलेले होते. ते दृश्‍य बघून अंगावर शहारे आले. तेथून परत आलो. अलका परत आलेली बघून चौधरी सरांसह आमच्याही जिवात जीव आला होता.
- श्यामराव कदम
मो. नं - ९४०३०४६५२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com