कोरेगाव पार्कमधील रस्ता रुंदीकरणातील अडचण कायम

कोरेगाव पार्कमधील रस्ता रुंदीकरणातील अडचण कायम
Published on

पुणे, ता. १८ ः कोरेगाव पार्क व मुंढवा येथील रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक असलेली लष्कराची जागा पुणे महापालिकेला मिळण्यातील अडचण अद्याप दूर झालेली नाही. आता संरक्षण मंत्रालयानेच संबंधित जागेच्या बदल्यात तेवढ्याच किमतीची जागा किंवा पायाभूत सुविधा देण्याबाबत महापालिकेला विचारणा केली आहे. याबाबतचा निर्णय महापालिका संरक्षण मंत्रालयाला कळविणार आहे.
विविध कंपन्यांची महत्त्वाची कार्यालये, संस्था, शाळा, महाविद्यालये, उद्योग, व्यवसाय अशा वेगवेगळ्या कारणामुळे कोरेगाव पार्क, केशवनगर, मुंढवा या परिसरात रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे कोरेगाव पार्कमधील लेन नंबर सात ते वेस्टीन चौक, त्यापुढे वेस्टीन चौक ते कार्निवल हॉटेल या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने संबंधित रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले.
हे काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोन पेट्रोल पंपांजवळील लेन नंबर सात ते वेस्टीन चौक या १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण झाले. आता हा रस्ता २४ मीटरचा झाला आहे. वेस्टीन चौकातील भैरोबा नाल्यावरील अरुंद पुलामुळे तेथील वाहतूक कोंडी अद्याप कायम आहे. वेस्टीन चौकापुढील कार्निवल हॉटेल ते ताडीगुत्ता चौक येथेही १८ मीटर रस्ता आहे. तो ३० मीटरचा केला जाणार आहे.
दरम्यान, एबीसी फार्म्स चौक ते ताडीगुत्ता चौक येथील रस्ता रुंदीकरणासाठी उजव्या बाजूची ९०० मीटर व डाव्या बाजूची १०० मीटर अशी एक किलोमीटरची जागा भाडेतत्वावर देण्याची मागणी महापालिकेने लष्कराकडे केली होती. त्याबाबत नोव्हेंबर २०२३ मध्ये लष्कराच्या रक्षा संपदा विभागामार्फत संरक्षण मंत्रालयास पत्र पाठविण्यात आले होते. त्यावर जागा भाडेतत्त्वाने देण्यास नकार दर्शविण्यात आला.
---------
कल्याणी पूल चौक ते ताडीगुत्ता चौक या दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी लष्कराची जागा लागणार आहे. संरक्षण मंत्रालयास पत्र पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून महापालिकेला पत्र मिळाले आहे. त्यांचे पत्र व जागेच्या मुल्यांकनासंबंधीची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर मांडण्यात येईल. त्यानंतर त्यांचा निर्णय संरक्षण विभागाला कळविला जाईल.
- सचिन बागडे, उपअभियंता, पथ विभाग, महापालिका
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com