पुणे-पंढरपूर सायकलवारी; आनंदवारी

पुणे-पंढरपूर सायकलवारी; आनंदवारी

- मोहन कुलकर्णी
वाखरी आलं... पंढरपूर पाच किलोमीटरवर आलं... वारकऱ्यांसारखं आम्हीही अक्षरशः सायकलवर ‘धावा’ केला... पंढरपुरात प्रवेश करताना पावसाच्या जोरदार सरींच्या सलामीतच आम्ही थेट नामदेव पायरी गाठली. सायकल मंदिरासमोर उभी करून बा... विठ्ठलासमोर नतमस्तक झालो. एका अनामिक समाधानात २०२४ची सायकलवारी विठुरायाच्या चरणी अर्पण केली. पुण्यातील ‘सायकोपाथ’ ग्रुपबरोबर या वर्षी तिसऱ्यांदा वारी घडली. ‘आधी बीज एकले’ म्हणत सात जणांपासून सुरू केलेला हा प्रवास १७, ३३ आणि या वर्षी ४० सायकलपटूंपर्यंत पोहोचला आणि ‘अवघा रंग एकचि झाला.’
पुणे पंढरपूर अंतर अंदाजे दोनशे किलोमीटर. आमची वारी दोन दिवसांची. रोज शंभर किलोमीटर सायकल चालवायची. सहा जुलैला पहाटे ५.०० वाजता शनिवारवाड्यावर ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल...’चा जयघोष झाला अन्‌ ४० सायकलस्वार दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. यावेळचा मार्ग माऊलींचा पालखी मार्ग होता. प्रचंड उत्साहात पहिला विसावा अर्थात दिवे घाट पायथा आलाही. पायी वारीतला हा अवघड टप्पा उत्साहात पार केला. दिवे घाटानंतर न्याहारी आणि पुढील विसावा जेजुरीच्या अप्रतिम बांधकामशैली असलेल्या बल्लाळेश्‍वर मंदिरात.
पुढे सगळ्यांनी सायकल हाणल्या ते थेट वाल्हेपर्यंत. वाल्ह्याच्या पुढे वारीची गर्दी लागली अन्‌ आम्हीही वारीत सामील झालो. नीरा स्नानासाठी थांबलेल्या पालखीचे दर्शनही झाले. पुढे फलटणमधील श्रीराम मंदिर आणि श्री जब्रेश्‍वर मंदिरात दर्शन घेतले अन्‌ पहिला दिवस संपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता फलटणहून सायकली पंढरपूरच्या दिशेने सुटल्या. वाटेत बाजीरावची विहीर अर्थात बारव पहिली. एक पुरातन ठेवा अनुभवला. त्यानंतर वाखरी आलं... ‘पंढरपूर पाच किमी’ हा मैलाचा दगड दिसला अन्‌ पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने सगळ्या सायकलस्वारांनी नामदेव पायरीच्या दिशेने अक्षरशः ‘धावा’ केला. नामदेव पायरीवरून बा... विठ्ठलाचे दर्शन घेत आमची वारी सुफळ संपूर्ण झाली.

‘सायकोपाथ’विषयी
‘सायकोपाथ’ हा पुण्यातील सायकलवेडा अवलिया विलास वाकळे यांनी सुरू केलेला ग्रुप. शनिवारवाडा किंवा डेक्कन या शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या दिशेने सायकलस्वार येतात, भेटतात. चहा-पोह्यांचा नैवेद्य होतो आणि पुन्हा आपापल्या घराच्या दिशेने जाऊन कामाचा दिवस सुरू होतो. या तासा-दोन तासांत मिळणारी ऊर्जा अक्षरशः दिवसभर पुरते. या ग्रुपच्या निमित्ताने पुण्यातील वेगवेगळ्या वारसास्थळांना भेटी देतो. पुण्याचा केंद्रबिंदू अर्थात झिरो माइलस्टोन, त्रिशुंड गणपती मंदिर, सेनेगॉग, १५५हुन अधिक वर्षे जुना मुठा-मुळा पूल, मराठा युद्ध स्मारक, शंभरी गाठलेले ‘आद्य’ अमृततुल्य आणि अशी बरीच ठिकाणं... मागच्या वर्षी आम्ही शिवाजी पुलाचा शतक महोत्सवी वाढदिवस साजरा केला. या ग्रुपमुळे असंख्य आठवणी गाठोड्यात जमा होतायंत आणि प्रत्येक ‘सकाळ’ प्रफुल्लित होतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com