कचरा व्यवस्थापनासाठी ‘एआय’चा वापर

कचरा व्यवस्थापनासाठी ‘एआय’चा वापर

Published on

पुणे, ता. ४ ः पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या महापालिका तसेच ‘स्वच्छ’ या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता यावी आणि त्यांची क्षमता वाढावी म्हणून ‘क्लीन ट्रॅक’ हा प्रयोग केला जाईल. त्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येईल.
कचरा संकलन, वर्गीकरण, कर्मचारी-नागरिक यांच्यातील समन्वय, तक्रारींचा निपटारा अशा कामांचे नियंत्रण करून त्यास गती देण्याचा यामागील उद्देश आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा शहरात स्वच्छता ठेवण्यावर भर असतो. याशिवाय घरोघरी जाऊन कचरा संकलन, वर्गीकरणाचे काम ‘स्वच्छ’ ही संस्था करते. ही कामे करताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरावेचकांची क्षमता बांधणी, नागरिकांच्या पातळीवरच कचरा वर्गीकरण न होणे, कचरा संकलनाचे पैसे न देणे, वेळेत काम करण्यातील मर्यादा अशा स्वरूपाच्या असंख्य अडचणींचा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागतो. याबरोबरच कचरावेचकांची अनुपस्थिती, सोई-सुविधांचा अभाव, नियमांच्या अंमलबजावणीकडे होणारे दुर्लक्ष असेही प्रश्‍न निर्माण होतात. या पार्श्‍वभूमीवर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेसह जनवाणी व कमिन्स इंडिया यांनी पुढाकार घेतला आहे.
याविषयी जनवाणी संस्थेचे उपसंचालक मंगेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘तक्रारी थेट पर्यवेक्षकांपर्यंत पोहचविणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे, ‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.’’
कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) विभागाच्या कार्यकारी व्यवस्थापक अवंती कदम म्हणाल्या, ‘‘घनकचरा व्यवस्थापन विभागात आघाडीवर काम करणारे कर्मचारी, पर्यवेक्षक यांच्या क्षमताबांधणीसाठी हा प्रयोग आहे. त्याद्वारे निरीक्षण, ‘ट्रॅकींग’वरही भर दिला जाणार आहे.’’
दरम्यान, मुंबईतील अमेरिकी वाणिज्य दूतावास, सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्सेस मॅनेजमेंट यांच्यातर्फे आयोजित ‘शहरातील शाश्‍वत कचरा व्यवस्थापन’ या विषयावर परिषदेत ‘क्लीन ट्रॅक’चा प्रस्ताव सादर करण्यात आला.
-------
शहरातील कचरा व्यवस्थापन विभागाला तंत्रज्ञानाची जोड देऊन कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये गती आणली जाणार आहे. त्याद्वारे शहर स्वच्छतेसह कर्मचारी, अधिकारी यांच्यातही योग्य समन्वय राखला जाईल.
- केतकी घाडगे, सहाय्यक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका
------------
असे आहेत फायदे
- कर्मचाऱ्यांच्या कामात गतीने सुधारणा होणार
- कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण, निरोगी आरोग्य व आर्थिक वृद्धीसाठी मदत
- कचरा टाकण्याची ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) कमी होण्यास मदत
- सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
- कामाची जबाबदारी निश्‍चित करणार
- सेवेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास उपयुक्त
- कचरा संकलन, वर्गीकरणात सुधारणा
- कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदणीवरही भर
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com