अभिजात मराठीचा जल्लोषात आनंदोत्सव

अभिजात मराठीचा जल्लोषात आनंदोत्सव

Published on

पुणे, ता. ४ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. आता कोणतेही मतभेद न करता अभिजात भाषांना समप्रमाणात निधी देण्याची तरतूद करण्यात यावी. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी आता अधिक वेगाने पावले उचलणे महत्त्वाचे ठरेल, असा संकल्प सोडत मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘संवाद’, पुणे यांच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर, साहित्यिक राजीव तांबे, अभिनेते राहुल सोलापूरकर, राजीव बर्वे, पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ‘संवाद’, पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. अभिनेते प्रवीण तरडे यांनी केंद्र शासनाचे अभिनंदन करणारा ठराव केला.
देशमुख म्हणाले, ‘‘आता निधीची तरतूद व्हावी, तसेच प्रत्येक भाषेचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यात यावे. विद्यापीठांनी मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत यापूर्वी चर्चा झाली आहे. यावर केंद्र सरकारने विचार करण्याची गरज आहे. या योजनांसाठी निकष ठरविण्यात यावेत आणि निधी देखील मंजूर करण्यात यावा.’’
‘आजची तरुण पिढी इंग्रजीच्या मागे धावत सुटली आहे. या पिढीला पुन्हा मराठी भाषेकडे ओढून आणण्यासाठी मराठी ही ज्ञान भाषा व्हायला हवी,’ असेही देशमुख यांनी अधोरेखित केले.
डॉ. गोसावी यांनी सांगितले की, ‘‘ विद्यापीठात मराठी भाषा भवन आहे. एक हजार पुस्तके मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’’
माडगूळकर म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात यावी आणि भाषा विकसित करण्याचे धोरण असावे.’’
पांडे यांनी प्रास्ताविक केले.
.........
अर्थसंकल्पात असेल भरीव तरतूद
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा भाषेचा गौरव आहे. आता आपले काम सुरू झाले असून भाषा विकास आणि प्रचार यादृष्टीने काम करावे लागेल. मराठी शाळा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे, पटसंख्या वाढवणे याबाबत काम करावे लागेल. पुढील अर्थसंकल्पात भाषेसाठी भरीव तरतूद करण्यात येईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
.......
गेल्या ११ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. जर्मनी, फ्रान्स आणि चीन या देशात मातृभाषेत शिक्षण दिले गेल्याने त्यांनी विकास साधला. अभिजात दर्जा टिकवणे हे साहित्यिक, कलाकार यांचे काम आहे. विद्यापीठांना ४०० कोटी रुपये दिले, तर त्याद्वारे मराठी भाषेसाठी विविध उपक्रम राबविता येतील. आता नावे ठेवण्यापेक्षा आनंद व्यक्त करून यात आणि भाषेसाठी निधी कसा येईल आणि त्याचा विनियोग कसा करायचा, यावर विचार करायला हवा. याशिवाय बोली भाषा हे मराठी भाषेचे वैभव आहे. त्यामुळे बोली भाषा टिकविणे गरजेचे आहे.
- रामदास फुटाणे, ज्येष्ठ साहित्यिक
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com