

पुणे/कोंढवा, ता. ४ : कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरण्यास गेलेल्या एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची १० पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तरुणी मूळची परराज्यातील असून, तिचा मित्र जळगावमधील आहे. गुरुवारी रात्री (ता. ३) ११ वाजण्याच्या सुमारास ते दोघे बोपदेव घाटात दुचाकीवर गेले होते. निर्जनस्थळी गप्पा मारत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. त्यांनी दोघांना धमकावून घाटातील पठारावर नेले. तरुणीच्या मित्राला मारहाण करून त्याला बेल्ट आणि कपड्यांनी झाडाला बांधले. त्यानंतर मित्रासमोरच तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर तिघे आरोपी पसार झाले. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने मित्राला कसेबसे सोडवले. त्यानंतर मित्राने तरुणीला रुग्णालयात नेले. रुग्णालय प्रशासनाने ही बाब पहाटे कोंढवा पोलिसांना कळविली. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही बाब रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास कोंढवा पोलिसांना कळविली. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची १० तपास पथके रवाना केली आहेत. आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.
- रंजन कुमार शर्मा,
पोलिस सह आयुक्त, पुणे
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!
बोपदेव घाटात तरुण-तरुणींना धमकावून विनयभंगाच्या घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वीच मित्रासमवेत बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून विनयभंग केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस गस्त वाढविण्याचा आदेश दिला होता. तरीही अशा प्रकारच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे कोंढवा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच कोंढव्यालगत उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आणि बोपदेव घाट परिसरात रात्री रस्त्यांवर विजेचे दिवे बंद असतात. त्यामुळे रस्त्यांवर अंधार असतो. याकडे ‘महावितरण’चे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना उपस्थित केला आहे.
पोलिस केंद्राची ‘मदत’ नाही
कोंढवा पोलिसांनी बोपदेव घाटात पोलिस मदत केंद्र उभारले आहे. परंतु याठिकाणी पोलिस पूर्णवेळ थांबत नाहीत. गुन्हेगार आणि चोरट्यांकडून त्याचा गैरफायदा घेण्यात येतो. या भागात पोलिसांची गस्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच पोलिस मदत केंद्राच्या परिसरात गुन्हेगारी घटना घडत आहेत.
कोंढवा ठाण्यात अपुरे मनुष्यबळ
कोंढवा ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या १४० इतकी आहे. ही संख्या २००८ मधील लोकसंख्येच्या आधारावर आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या आधारावर पोलिसांची संख्या २५० ते २६० असायला हवी. मात्र, प्रत्यक्षात ती नाही. या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर मर्यादा येत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.