राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला असावे प्राधान्य
पुणे, ता. ४ ः ‘‘देशातील अंतर्गत राजकीय भांडणे टोकाला जातात, त्यावेळी बाहेरची लोक फायदा घेतात. राष्ट्रकारण विसरून राजकारणाचा अट्टहास केला जातो, त्यावेळी त्या देशाची अधोगती सुरू होते. त्यामुळे राजकारणापेक्षा राष्ट्रकारण आणि मानवता धर्म महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे’’, असे मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक-विश्लेषक, व्यूहनीतिज्ञ, लेखक व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे संस्थापक-अध्यक्ष संदीप वासलेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘साप्ताहिक सकाळ’च्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते. ‘तिसरे महायुद्ध की वसुधैव कुटुंबकम्’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. वासलेकर यांनी ‘अ वर्ल्ड विदाऊट वॉर’ या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या अनुषंगाने जागतिक स्थितीविषयी मांडणी केली. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस, ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक माधव गोखले उपस्थित होते.
वासलेकर म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही हालचाल होताच ‘विश्वयुद्ध’ होणार अशी आवई आपल्याकडे उठते, पण त्याआधी ‘विश्व’ ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. ज्या देशांमधील लोक युद्ध घडवून आणणाऱ्या नेत्याला मोठे मानतात आणि जेथील माध्यमांनाही युद्धाच्या गप्पा करण्यात मोठेपणा वाटतो, त्याच देशांमध्ये युद्धाला महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना युद्ध कसे घडणार, याबाबतच्या बातम्यांमध्येच जास्त रस असतो. शांततेचा करार झाल्याच्या बातम्यांना मात्र ते प्राधान्य देत नाहीत. आजूबाजूचे देश युद्धखोर असताना एखादा देश युद्धाशिवाय कसा राहू शकेल, असा प्रश्न विचारला जातो, पण स्वित्झर्लंडसारख्या देशांनी हे साध्य करून दाखवले आहे.’’
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ सरकार किंवा नेतेच घडवू शकतात, असे नाही तर; सामान्य माणसेही हे साध्य करू शकतात, असे सांगत वासलेकर म्हणाले, ‘‘सामान्य माणसेही युद्ध थांबवू शकतात, हे आजवर अनेकांनी सोदाहरण सिद्ध केले आहे. ज्याप्रमाणे केवळ २०-२५ देश महायुद्ध घडवून आणू शकतात; त्याचप्रमाणे २०-२५ लोकांनी मनापासून काम केल्यास ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.’’
माधव गोखले यांनी आपल्या मनोगतात ‘साप्ताहिक सकाळ’चे नवे रूप आणि त्याची वाचकांशी असलेली बांधिलकी उलगडली. ‘साप्ताहिक सकाळ’च्या वरिष्ठ उपसंपादक इरावती बारसोडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
----
‘युद्ध केवळ मोजक्या देशांचा खेळ’
‘जगातील १९३ पैकी २३ देशांमध्ये संरक्षण दलच नाही. १२३ देशांनी अण्वस्त्रांच्या विरोधात संयुक्त राष्ट्रसंघात ठराव मंजूर केला आहे. १७० देशांची संरक्षणासाठीची अर्थिक तरतूद एक लाख अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. याचा अर्थ जगात युद्ध घडवून आणण्याची इच्छा फक्त २५-३० देशांना आहे. युद्ध हा केवळ याच मोजक्या देशांचा खेळ आहे,’ असे संदीप वासलेकर यांनी नमूद केले.
----
‘तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची’
‘‘आता तंत्रज्ञान हा एक नवा पैलू पुढे आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शस्त्रास्त्रांमध्ये केला गेला, तर संपूर्ण मानवजातीचा संहार होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. ही भीती खरी आहे. उद्या महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी युद्ध करायचेच नाही, असे ठरवले तरी जर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदममध्ये फेरफार झाले तरी जागतिक महायुद्ध होऊ शकते,’’ अशी भीती वासलेकर यांनी व्यक्त केली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
