सीए तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कामगार कायद्यांनुसार खटला दाखल
पुणे, ता. ९ ः कामाच्या अतिताणामुळे सनदी लेखापाल (सीए) तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी कामगार विभागाने इवाय कंपनीत जाऊन कामगारांशी संबंधित विविध बाबींची चौकशी केली आहे. त्यात त्यांना कंपनीच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्या असून, त्यानुसार कंपनीविरोधात विविध कामगार कायद्यांनुसार खटला दाखल करण्यात आला आहे. कामगार विभागाने ही कारवाई केली आहे.
इवाय कंपनीत कार्यरत असलेल्या ॲना सेबॅस्टियन (वय २६) या तरुणीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. कामाच्या अतिताणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला होता. तरुणीची आई अनिता सेबॅस्टियन यांनी कंपनीवर केलेल्या गंभीर आरोपामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात कामगार विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिली. विविध कामगार कायद्यानुसार कंपनीच्या कामकाजात त्रुटी असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुढील कायद्यानुसार खटला दाखल ः
- समान मोबदला कायदा
- वेतन देय कायदा
- किमान वेतन कायदा
- मातृत्व लाभ कायदा
- घरभाडे भत्ता अनुपालन
- महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा
कुटुंबीयांना २९ लाखांची भरपाई ः
मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांना कंपनीकडून सुमारे २९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तरुणीचा तीन वर्षांचा पगार तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात आला आहे, अशी माहिती कामगार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, कंपनीतील मृत्यूबाबत खेद व्यक्त करत आम्ही आमच्या कंपनीत काम करणाऱ्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण कसे मिळेल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतात आमच्या जेवढ्या शाखा आहेत, तेवढ्या शाखांमध्ये कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असेल, कुणावरही ताण येणार नाही असे वातावरण आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.
चौकशीत काय आढळले ः
तरुणीच्या मृत्यूनंतर कंपनीच्या कामकाजाची चौकशी करण्याबाबतचा अर्ज आमच्याकडे आला होता. त्यानुसार आम्ही गेल्या महिन्यात कंपनीत जाऊन चौकशी केली. तेथे आम्हाला विविध कामगार कायद्यांत नमूद असलेल्या काही बाबींची पूर्तता होत नसल्याचे लक्षात आले. त्यानुसार कंपनीवर खटला दाखल करण्यात आला आहे. खटल्याच्या स्वरूपानुसार कामगार न्यायालय आणि प्रसंगी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटले चालवले जातील, असे कामगार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

