चित्रकार दांपत्याने तरलतेने साकारलेली ‘ती’
नीला शर्मा
तिचे अस्तित्व जेव्हा ‘ती’ चित्रातून मांडते, तेव्हा त्यातून बरेच काही प्रकटते. तिच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, आत्मविश्वास व सौंदर्य तिला वेगळेच दिसते. तो जेव्हा ‘ती’ साकारतो, तेव्हा त्याला तिच्यातील चैतन्य, स्थिरता आणि कोमलता आदी वेगळ्या रीतीने उलगडताना दिसतात. वर्षा व रामचंद्र खरटमल या दांपत्याने साकारलेल्या ३८ चित्रांचा आस्वाद रसिकांना घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात सुरू असलेल्या ‘ती’ या प्रदर्शनातून घेता येईल.
स्त्रीचे अंतरंग विविध मुद्रांतून टिपण्याचा प्रयत्न वर्षा व रामचंद्र यांनी केला आहे. दोघांनी रेखाटलेल्या आकृतिबंधात फरक असला तरी स्त्रीच्या जाणिवांचा वेध घेण्याची असोशी हा समान धागा दोघांमध्ये दिसतो. वर्षा यांनी चितारलेल्या कलाकृती स्त्रीचे स्वप्नमय अंतरंग कलात्मक रीतीने मांडतात. त्यांच्या चित्रांमधील स्त्रीचे नाक व डोळे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रामचंद्र यांच्या चित्रांमधील स्त्रीरूपे वास्तवदर्शी आहेत. शरीरयष्टी रेखाटताना कमालीची प्रमाणबद्धता, ही त्यांची खासियत. त्यांच्या चित्रांमधील नायिकेचे मार्दव हा जणू त्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे.
इतिहास आणि वर्तमानातील संदर्भ हे या दोघांच्या चित्रशैलीत जाणवतात. चित्रांकनात परस्परभेद असले तरी दोघांची चित्रे परस्परांशी संवाद साधल्यासारखी आहेत. दोघांच्याही चित्रांमधून स्त्रीच्या अंतरंगाचा धांडोळा घेतलेला दिसतो. बाह्यवस्तूंचे नेमकेपणाने आरेखन, वस्त्रांचा वास्तवदर्शी पोत, निसर्गातील फूल किंवा मोर यांसारख्या घटकांची योजना या दोघांच्या चित्रांमध्ये लक्षवेधी ठरते.
रामचंद्र मूळचे सोलापूरचे. तेथील चादरींची खास ओळख सर्वदूर आहे. त्यांच्याशी असलेले नाते जपत रामचंद्र यांनी विलक्षण प्रयोग केला आहे. पांढऱ्या चादरींवर काळ्या धाग्यांनी विणकरांकडून तयार करवून घेतलेली चित्रे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. चित्रकाराने अत्यंत सूक्ष्मपणे केलेल्या संरचना विणकरांकडून सफाईदार पद्धतीने करवून घेतल्याची ग्वाही ही चित्रे देतात. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. १३) सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत खुले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

