उद्घाटन अन् भूमिपूजनाचा धडाका
पुणे, ता. २५ ः जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो, सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनासह एकूण १२ प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २६) होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
पंतप्रधान मोदी हे उच्च न्यायालय मेट्रो स्टेशन येथे मेट्रोला हिरवाझेंडा दाखवतील. ते भूमिगत मेट्रोने प्रवास करून स्वारगेट येथे जाणार आहेत, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वारगेटवरून ते स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी जाणार आहे. त्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो
फेज एक मेट्रोचा जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मेट्रो हा शेवटचा ३.६२ किलोमीटरचा टप्पा आहे. त्यामध्ये कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्टेशन आहेत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर स्वारगेट वरून थेट पिंपरीपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. यामुळे पुढील सहा महिन्यात दोन लाखांपर्यंत प्रवासी वाढणार आहेत.
स्वारगेट ते कात्रज
केंद्र सरकारने स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेला मान्यता दिली आहे. त्याच भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामासाठी दोन हजार ९५४ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागेल. मार्केटयार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज या मेट्रोचा फायदा होईल.
भिडे वाडा स्मारक भूमिपूजन
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाला भिडे वाड्यात सुरू केली. ही जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर तेथे स्मारक करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्त होणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाची ८६७१ कोटींची कामे
पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाच्या आठ हजार ६७१ कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचे उद्घाटन या कार्यक्रमात होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांसाठी अद्ययावत विश्रामगृह, फास्ट इ व्हेईकल चार्जिंग स्टेशन, मल्टिपल फ्लुअल स्टेशन, एलएनजी स्टेशन या कामाचा समावेश आहे.
सोलापूर विमानतळ
केंद्र सरकारने ६५ कोटी रुपये खर्च करून सोलापूर विमानतळ उभे केले आहे. तेथे दर तासाला दीडशे तर वर्षभरात चार लाख प्रवासी प्रवास करणार आहेत. या विमानतळामुळे सोलापूर येथील कापड उद्योग, शेती माल निर्यात करण्यास चालना मिळणार आहे. या विमानतळावर दोन क्यू - ४००, एटीआर- ७२, दोन बीसीएच- १९००डी या प्रकारच्या विमानांसाठी पार्किंगची सुविधा केली आहे. याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
‘सीडॅक’चे तीन सुपर कॉमप्युटर
नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशनच्या अंतर्गत तीन ‘परम रुद्र सुपर सुपर कॉम्प्युटर’ विकसित केले आहेत. आयुका नवी दिल्ली, एससीआरए पुणे आणि एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स या तीन संस्थांनी हे कॉम्प्युटर विकसित केले आहेत. केंद्र सरकारने २०१५ मध्ये नॅशनल सुपर कॉम्प्युटरची चार हजार ५०० कोटी रुपयांची योजना सुरू केली. त्यातून १२९ कोटी रुपये खर्च करून हे तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर तयार करण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हवामान विभागाचा ८५० प्रकल्प
हवामान आणि वातावरण बदल यावर अभ्यास करणाऱ्या हाय परफॉरमन्स कॉमप्युटिंग (एचपीसी) सिस्टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ८५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी होत आहे.
बिडकीन औद्योगीक क्षेत्र
केंद्र सरकारच्या नॅशनल इंडस्ट्रिअल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ इंडियाच्या अंतर्गत सात हजार ८५५ कोटी रुपये खर्च करून संभाजीनगर येथे बिडकीन औद्योगीक वसाहत विकसित करण्यात आली आहे. देशभरातील अनेक मोठ्या उद्योगांनी या ठिकाणी भूखंड घेतले असून, हजारो कोटी रुपयांची गुतंवणूक करण्यात येणार आहे. याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.