आईपण भारी, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर

आईपण भारी, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर

अभिनेत्री प्राजक्ता हनमघर


ज्यावेळी दुसऱ्यांदा लॉकडाउन लागले, त्यादिवसापर्यंत मी काम करत होते. यादरम्यान मी प्रेग्नंट असल्याचे समजले. त्यामुळे मला पहिले दोन-तीन-महिने छान आराम मिळाला आणि काळजीही घ्यावी लागली. मात्र, चौथ्या महिन्यात मी ‘हवाहवाई’ चित्रपटात भूमिका साकारली. प्रेग्नंट असताना चित्रपटात काम करणं, हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि तो आता कायम लक्षात राहील. कारण, मी असं म्हणेल की माझ्या मुलीचा त्या चित्रपटातून डेब्यू झाला आहे.
आम्हाला बाळ हवं होतं अन् आम्हाला पाहिजे त्यावेळी मी प्रेग्नंट होते. त्यामुळे आम्ही खूपच खूष होतो. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या तर आपण छान स्वीकारतो, तसं आमचं झालं. त्यामुळे नंतर काम थांबवावं लागलं किंवा ब्रेक घ्यावा लागला, या कुठल्याच गोष्टीच मला काही वाटलं नाही. आणि मला कधीच ती तडजोड वाटली नाही. त्याकाळात मला खूप चित्रपट पाहता आलो. खूप वाचनही केलं. लॉकडाउनमुळे बाहेरजाणं खूप कमी होत होतं. मात्र खूप लोकांच्या भेटीगाठी घरी होत होत्या. त्यामुळे तो काळ खूपच छान आणि आनंददायी गेला.
मी कधीही आई झाले तरी करिअरमध्ये छोटासा थांबा येणार, हे मला आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळे ते तुम्ही स्वीकारता कसं?, हे खूप महत्त्वाचं असतं. मला पाहिजे तेव्हा मी प्रेग्नंट असल्याने तो ब्रेक मी खूप छान पद्धतीने स्वीकारला. विशेष म्हणजे पुन्हा केव्हा काम सुरू करायचे, याबाबत मी काहीच प्लॅनिंग केले नव्हते. कारण, तो वेळ बाळाला देऊन मलाही उपभोगायचं होतं. पहिलं वर्ष सर्वच आईंसाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण शारिरिक, मानसिक अशा अनंत पातळ्यांवर बदल झालेले असतात. आणि त्या बदलांना ग्रेसफुली आपल्याला सामोरे जायचं असतं, इतकंच आपल्या हातात असतं. त्यामुळे पहिल्या वर्षभरात अॅडजेस्टमेंटच होत्या.
पहिले चार महिने माझी मुलगी अजिबातच झोपत नव्हती. त्यामुळे ते दिवस म्हणजे माझ्यासाठी रोलर- कोस्टर राईडची होती. रात्रभर आम्ही तिला आळीपाळीने मांडीवर घेऊन बसायचो. त्यातच तिला लाइट लागायची. तिला शटल होईपर्यंत वर्ष गेलं. त्यामुळे पहिल्या वर्षाचे सर्व अनुभव खूप धमाल होते. प्रत्येक महिन्याला तिच्या जन्मतारखेनुसार मी तिचे छान कपडे घालून व नटवून फोटो काढायचे. आम्ही सगळ्यांनी तिला प्रचंड वेळ दिला. रावी नऊ महिन्यांची असताना मी ‘फू बाई फू’ सुरू केलं. तीन महिन्यांचा प्रोजेक्ट असल्याने मी तो स्वीकारला होता. दर आठवड्याला मी, रावी, माझा नवरा व माझी आई मुंबईला प्रवास करायचो. तिला कळण्याआधी तो प्रवास व्हावा, म्हणून आम्ही पहाटे चार वाजता पुण्याहून निघायचो. लवकर चित्रीकरण संपवायचो. दुसऱ्यादिवशी मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी पहाटेच निघत असतं. त्यामुळे तिचा प्रवास छान होत असे. तिने अजिबात त्रास दिला नाही. दिवसभर ती मला मॅनेज करत असतं. मध्ये-मध्ये येऊन मी तिला भेटून जात असे. खरंतर ही गोष्ट खूप आव्हानात्मक होती. ते कायमचं माझ्या आठवणीत राहील.
आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला नाही. मात्र, मी कुठलाही प्रोजेक्ट घेताना रावीचा विचार करते. ते आपसूकच होतं. कारण, आई झालेल्या सर्वच महिलांच्या बाबतीत हे होतंच असतं. कारण, आपण कामात असताना मुलांचं कसं मॅनेज होणार, हे सगळं पहावं लागतं अन् त्यानुसारच प्रोजेक्ट घ्यावा लागतो. भारंभार काम मी घेत नाही. कारण काही काळ काम व जास्तीत जास्त वेळ तिला कसा देता येईल, याकडे मी लक्ष देते. घरात इतर माणसं असतात; पण आमच्या दोघांपैकी एकजण तिच्याजवळ असतो. मला माझ्या कुटुंबाचा खूप पाठिंबा असल्याने काहीही अडचण येत नाही.

करिअरिस्ट मुलांना टिप्स...
१) करिअरिस्ट नव्हे तर प्रत्येक मुलीला जेव्हा हवं, तेव्हा आई होण्याचा हक्क आहे. आई, सासू विचारतेय, लोक काय म्हणतात, लग्न होऊन खूप वर्षे झाली, या गोष्टींचा विचार करू नका. तुम्हा दोघांना मनापासून वाटेल, तेव्हाच मुलं होवू द्या, असं मला वाटतं. प्रेग्नंसी व आई झाल्यानंतरचा काळ खूप आनंदात घालवा. कारण, हा काळ परत कधीच आलेला नसतो. 
२) प्रेग्नंसीच्या काळात प्रचंड हार्मोलन्स इनबॅलन्स झालेला असतो. हार्मोन्स बदललेले असतात, अनेक गोष्टींसह शरीर बदललेले असते, या बदलांना सकारात्मक रीतीने सामोरे जा.
३) शारिरिक बदल खूप होतात अन् मुली म्हणतात, मी पहिल्यासारखे कधी दिसणार, ही गोष्ट मनाला लावून घेतात. त्यासाठी
मनाला व शरीराला थोडा वेळ द्यावाच लागतो. घाई करू नका. 
४) करिअर करताना आई होण्याबाबत मनात संकुचित वृत्ती ठेवू नका. कारण, त्यामुळे तुम्ही करिअर व आई म्हणून छान पद्धतीने लक्ष देवू शकणार नाही.
५) बाळ ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी विभागायला शिका. ‘सुपर वूमन’ होण्याच्या नादात हे सर्व मीच करेल, हे सोडून द्या. बाळाचं करताना तुम्हालाही तुमचा वेळ द्या. छान रहा. २३ जानेवारीला माझी मुलगी दोन वर्षांची होईल. हा काळ आम्ही सर्वानी एन्जॉय केला आहे. मुलं झाल्यानंतर नवरा- बायको या नात्याकडे सुरुवातीला थोडं दुर्लक्ष होतं. पण, ते तुम्हाला परत जुळवून आणावे लागते.
-------------------------------------
( शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com