जमिनीच्या वादातून शरद मोहोळचा खून

जमिनीच्या वादातून शरद मोहोळचा खून

पुणे, ता. ६ : गुंड शरद मोहोळ आणि मुन्ना पोळेकरचा मामा यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद होता. या वादातूनच पोळेकरने साथीदारांच्या मदतीने मोहोळचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले. या प्रकरणात दोन वकिलांसह आठ जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शरद हिरामण मोहोळचा (वय ४०, रा. कोथरूड) शुक्रवारी दुपारी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. सुतारदरा, कोथरूड) आणि त्याच्या दोन साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना पोळेकर याचे नाव उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली. आरोपी खेड- शिवापूर टोल नाका ओलांडून शिरवळच्या दिशेने मोटारीतून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या मोटारीचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून आठ जणांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्यांमध्ये मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे (वय ३५, रा. भूगाव), अमित ऊर्फ अमर कानगुडे (वय २४, पर्वती), चंद्रकांत शेळके (वय २२, रा. जनता वसाहत), विनायक गव्हाणकर (वय २०, रा. पौड), विठ्ठल गांदले (वय ३४, रा. सुतारदरा) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन मोटारींसह तीन पिस्तूल, तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे, मोबाईल असा २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात ॲड. रवींद्र पवार (वय ४०, रा. मुळशी) आणि ॲड. संजय उडान (वय ४३, कोथरूड) या दोन वकिलांनाही अटक केल्याचे पोकळे यांनी सांगितले.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर या वेळी उपस्थित होते. तपास पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, शब्बीर सय्यद, श्रीहरी बहिरट, महेश बोलकोटगी, क्रांतिकुमार पाटील, सोमनाथ जाधव, उल्हास कदम, सुनील थोपटे, अभिजित पाटील, मोहनदास जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

पोळेकर असा झाला मोहोळ गटात सहभागी
सुतारदरा परिसरात मोहोळचे घर मुन्ना पोळेकरच्या घरापासून काही अंतरावरच आहे. पोळेकरने पहिल्यांदा मोहोळच्या साथीदारांशी ओळख वाढविली. मागील महिनाभरापासून तो मोहोळसमवेत वावरत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. त्याचा फायदा घेत त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मोहोळवर गोळ्या झाडल्या.

पोळेकरचा मामा नामदेव कानगुडे आणि नातेवाईक विठ्ठल गांदले यांचा जमिनीच्या कारणावरून मोहोळशी वाद होता. या कारणावरून पोळेकर व त्याच्या साथीदारांनी मोहोळचा खून केला. या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक केली असून, त्यांचा सहभाग तपासण्यात येत आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
- रामनाथ पोकळे, प्रभारी सहपोलिस आयुक्त.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com