आरोपींसह वकिलांना पोलिस कोठडी

आरोपींसह वकिलांना पोलिस कोठडी

पुणे, ता. ६ ः गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने शनिवारी (ता. ६) सुनावली. या वेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

शरद मोहोळ खून प्रकरणातील संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. संशयित आरोपींना घेऊन पोलिसांची वाहने न्यायालयाच्या आवारात दाखल झाली. आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी. बिराजदार न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त करीत वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने जमले होते.

सुनावणीदरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड. एच. व्ही. निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्‍वजीत पाटील यांनी वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात. त्यामुळे त्यांना आरोपी करण्याची गरज नाही, ते तपासाचा भाग होत नाहीत, असा जोरदार युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्‍यक असल्याचे सांगत ॲड. रवींद्र पवार व ॲड. संजय उडाण यांना आठ जानेवारीपर्यंत तर इतर आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

...आणि वकिलास अश्रू अनावर झाले!
‘‘आम्हाला आरोपींचा फोन आला की त्यांनी खून केला असून, त्यांना पोलिस ठाण्यात हजर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली. त्यावेळी तिथे आलेल्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण त्यांनी आमचे ऐकले नाही,’’ अशा शब्दांत एका वकिलाने आपली बाजू मांडली. तर ‘‘आम्ही १५ वर्ष वकीली व्यवसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही,’’ असे सांगताना अन्य एका वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com