जरांगे यांच्यासह मराठा समन्वयकांविरुद्ध गुन्हा

जरांगे यांच्यासह मराठा समन्वयकांविरुद्ध गुन्हा

पुणे, ता. १० : सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू असताना, वाघोली परिसरात पहाटे विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सभेचे आयोजक आणि समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी पोलिस नाईक रितेश दिलीप काळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून जरांगे यांच्यासह समन्वयक आणि आयोजक गणेश म्हस्के, संदीप कांबिलकर, शेखर पाटील आणि इतर आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी जरांगे अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांचा २३ जानेवारीला रात्री वाघोली परिसरातील चोखी ढाणी येथील मैदानावर मुक्काम होता. या मैदानावर मुख्य सभेचे आयोजन केले होते.

वाघोलीतील मराठा समन्वयक आणि आयोजकांनी सभेच्या परवानगीसाठी लोणीकंद पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू होता. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांना पहाटे ध्वनिवर्धक लावण्यास आणि सभा घेण्यास मनाई केली होती. प्रत्यक्षात जरांगे यांनी वाघोलीत २४ जानेवारीला पहाटे चार वाजता सभा घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई आहे. परंतु आयोजकांनी विनापरवाना ध्वनिवर्धक लावून, विनापरवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com