वारजे रुग्णालय विकासाचे नवे प्रारूप : फडणवीस

वारजे रुग्णालय विकासाचे नवे प्रारूप : फडणवीस

पुणे ता. १० : ‘‘सरकारी-खासगी भागीदारीतून (पीपीपी) आरोग्य सेवा देण्याचे राज्यातील नवे प्रारूप पुण्यात निर्माण झाले आहे. देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आर्थिक मदतीतून रुग्णालय उभारण्याचा प्रयोग वारज्यातील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होत आहे. पुणे हे महाराष्ट्राचे विकासाचे इंजिन आहे. त्यामुळे या भागाच्या विकासावर भर देण्यात आला आहे,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्रमांक ३०मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कै. अरविंद बारटक्के दवाखाना येथे आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.
‘‘अनेक वर्षांचे स्वप्न या प्रकल्पामुळे पूर्ण होत आहे. पण, या प्रकल्पाच्या जोखमीची हमी आहे का, हे स्पष्ट करावे,’’ असे सुळे यांनी सांगितले.
त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जोखमीची हमी नेदरलँड येथील विमा कंपनीने घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा कोणताही बोजा महापालिकेवर पडणार नाही. रुग्णालय उभारणीच्या खर्चाचा व्याजदर केवळ सव्वा टक्के आहे. त्यामुळे रुग्णालयातील दरही कमी ठेवणे शक्य होणार आहे. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खासगी भागीदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील.’’
पवार म्हणाले, ‘‘कोविड उद्रेकाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. सामान्य माणसाला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि सहा टक्के खाटा केंद्रीय आरोग्य योजनेच्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’
तापकीर म्हणाले, ‘‘येथे ३७५ खाटांच्या या रुग्णालयात नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे.’’
विक्रम कुमार यांनी महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत माहिती दिली. घोरपडी येथील उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जर्मनीच्या स्टीफन यांचा संदेश दाखविण्यात आला.

महापालिकेतर्फे ५०० कोटी रुपयांची कामे
महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. या वेळी फडणवीस पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाइनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल आणि वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाइनवर नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वारजे येथील २४ मीटर डीपी रस्त्याचे भूमिपूजनही या वेळी करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com