पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम निश्चित

पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम निश्चित

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ : राज्यात तीन ते आठ वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी असणाऱ्या ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२४’ला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. या आराखड्यानुसार बालकांच्या पायाभूत स्तरावरील म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीचा राज्यात पहिल्यांदाच अशापद्धतीने अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकांची छपाई होऊन ती अंगणवाड्या आणि बालवाड्यांना येत्या शैक्षणिक वर्षात (२०२४-२५) मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र पद्धतींशी संबंधित शैक्षणिक स्तरांची पुनर्रचना केली आहे. या धोरणात सूचविल्यानुसार, ५+३+३+४ या नवीन संरचनेमध्ये वय वर्षे तीन ते आठ या पहिल्या पाच वर्षांच्या टप्प्याला ‘पायाभूत स्तर’ म्हटले आहे. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२०२२) यातील संदर्भ घेऊन ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२४’ तयार केला आहे. शिक्षक व बालकांना केंद्रस्थानी मानून हा आराखडा तयार केला. पायाभूत स्तरामध्ये सर्वांगीण विकासाचे क्षेत्र, बालकांमध्ये विकसित करण्याच्या क्षमता आणि वयानुरूप अध्ययन निष्पत्ती या स्वरूपात आराखड्याचा पट मांडला असल्याची माहिती ‘एससीईआरटी’च्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.


असा आहे पायाभूत स्तर
बालकांचा वयोगट : तपशील
शून्य ते तीन वर्षे : प्रामुख्याने घरामध्ये व्यक्तीत होणारा कालावधी
तीन ते सहा वर्षे : अंगणवाड्या, बालवाड्या आणि खासगी बालशिक्षण केंद्रातून प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण देणे
सहा ते आठ वर्षे : शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधून प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली आणि दुसरी) देणे

राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे ध्येय
तीन ते आठ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण, सुयोग्य वातावरणात मिळवून देणारे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे.

आराखड्यात यावर भर
- बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षणाकडे संक्रमण
- घोकंपट्टीऐवजी चिकित्सक आणि विश्लेषणात्मक विचारांवर भर
- नवीन अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय संरचनेचा स्वीकार
- बालकांचा बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, नैतिक आणि भावनिक सर्वंकष विकास
- अभ्यासक्रमात विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला, भाषा, खेळ, गणित आणि व्यावसायिक शिक्षण यांसारख्या विषयांवर भर
- मूल्य संकल्पना, अनुभवाधारित अध्ययन, विश्लेषण आणि चिंतन, मूल्ये आणि जीवन कौशल्ये शिकण्यावर भर


पूर्व प्राथमिक शिक्षणातील (बालवाडी) बालवाटिका १, २ आणि ३ (नर्सरी, छोटा गट, मोठा गट) यासाठीचा अभ्यासक्रम निश्चित झाला असून बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच जूनपासून
बालवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
- डॉ. शोभा खंदारे,
सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com