पत्नीचे उत्पन्न अधिक असल्याने पोटगी नाही

पत्नीचे उत्पन्न अधिक असल्याने पोटगी नाही
Published on: 

पुणे, ता. १७ : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्याने तिने केलेला पोटगीसाठीचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. पत्नीने दिलेल्या शपथपत्राच्या आधारे तिला दरमहा एक लाख ११ हजार ८५० रुपये वेतन आहे. तसेच पत्नीने उपचारांबाबत कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, असे नमूद करत न्यायाधीश एस. एन. रुक्मे यांनी अर्ज फेटाळला.

विवाहानंतर ११ महिने संसार केल्यानंतर पत्नी २०१६ मध्ये घर सोडून गेली होती. पत्नी परत न आल्याने पतीने ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’नुसार चार वर्षांहून अधिक काळ विभक्त राहत असल्याचे कारण देत ॲड. कल्पना निकम यांच्यामार्फत घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यानंतर पत्नीने अंतरिम पोटगीसाठी अर्ज केला होता. पती जिम ट्रेनर आहे. तसेच त्याचे कॅफे आहे. त्याचे सुमारे ८० हजार रुपये मासिक उत्पन्न आहे. तर माझे मासिक उत्पन्न ६८ हजार रुपये आहे. हे पतीपेक्षा कमी आहे. मी आजारी असते. उपचार घ्यावे लागत असल्याने पोटगी मिळावी, असे पत्नीने दाखल केलेल्या अर्जात नमूद आहे. या अर्जास ॲड. निकम यांनी विरोध केला. पतीचे मासिक उत्पन्न ८० हजार रुपये असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. मात्र, त्याचा कागदोपत्री पुरावा नाही, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी केला.

पत्नीने तिचे उत्पन्न ६८ हजार ८२३ रुपये असल्याचे नमूद केले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पती-पत्नीने संपत्ती, उत्पन्नाचे स्रोत याची माहिती शपथपत्राद्वारे न्यायालयात देणे बंधनकारक आहे. यात दिलेल्या माहितीनुसार पत्नीला फेब्रुवारी २०२४ महिन्यात एक लाख ११ हजार ८५० रुपये वेतन आहे. त्यातील ८४ हजार ८६७ रुपये हातात येत असल्याचे दिसून आले. तसेच ती आजारी असल्याचे म्हणत आहे. मात्र, तिने याबाबत कोणतीही कागदपत्रे जोडलेली नाहीत, असे निकालात नमूद आहे.

घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानंतर पत्नीने अंतरिम पोटगीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार पत्नीचे उत्पन्न जास्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळली.
- ॲड. कल्पना निकम, पतीच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.