रमजान परिचय

रमजान परिचय

उपभोगशून्य स्वामी
हजरत पैगंबर जन्माला आले त्या वेळी अरबस्तानची भीषण परिस्थिती पाहिली म्हणजे अरबस्तानचा उद्धार होईल, अशी आशा प्रदर्शित करणेदेखील वेडेपणाचे ठरले असते. धर्म व राज्य या दोन्हींची सूत्रे आपल्या हाती संपूर्णपणे आल्यानंतरही हजरत पैगंबरांनी आपला तोल जाऊ दिला नाही. या बाबतीत हजरत पैगंबरांना उल्लेखून ‘बोसवर्थ स्मिथ’ नावाच्या प्रसिद्ध इतिहासकारांनी काढलेले उद्‌गार मनन करण्यासारखे आहेत. ते म्हणतात, ‘‘राज्यप्रमुख व धर्मप्रणेता यांचा संयोग त्यांच्यात (हजरत पैगंबरात) झाल्यामुळे सीझर व पोप या दोहोंच्याही व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार त्यांच्यामध्ये झाला होता.’’ हजरत पैगंबरांमध्ये या दोन महत् पदांचा समन्वय झाला असतानाही त्यांच्या विनम्रतेत व साधेपणात काडीचाही फरक झाला नाही. त्या वेळी इस्लाम धर्माचे मूळ धरावयास अरबस्तानची जमीन अगदीच खडकाळ होती. त्यांनी अविश्रांत परिश्रमांनी ही जमीनही सुपीक केली आणि त्याच ठिकाणी इस्लाम धर्माचे बीजारोपण करून दाखविले. जे कार्य करण्याकरिता कित्येक धुरिणांचे परिश्रम फुकट गेले, कित्येकांची विद्वत्ता वाया गेली, कित्येकांची सत्ता संपुष्टात आली, कित्येकांचे तपोबल निस्तेज ठरले, ते कार्य हजरत पैगंबरांनी अवघ्या २० वर्षांत करून दाखविले.
या यशाचे कारण विलास, ऐषआराम, उपभोग हे शब्दच त्यांना माहिती नव्हते. हजरत पैगंबरांचे लग्न त्यांच्या वयाच्या
२५ व्या वर्षी खदीजाबीशी झाले. आपल्या आयुष्याच्या ५० वर्षांपर्यंत त्यांनी खदीजाबींशी अत्यंत आनंदाने संसार केला. हजरत पैगंबरांचे चरित्र्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आयुष्य कसे जगावे व कसे जगू नये, याचे ते आदर्श आहेत. मदिनेच्या राज्याची सर्व सूत्रे हाती आली असता, त्यांच्या पूर्वीच्या साध्या वृत्तीत काडीमात्र फरक पडला नाही. पूर्वीप्रमाणे ठिगळ लावलेला झगा, तेच जाडेभरडे कपडे, तेच चंद्रमौळी निवासस्थान आणि तोच आहार. हजरत पैगंबरांच्या भेटीकरिता निरनिराळ्या देशाचे राजकीय वकील येत, तेव्हा त्यांना भेटावयाच्या वेळी हजरत पैगंबरांनी भरजरी कपडे घालावेत, अशी त्यांच्या अनुयायांनी केलेली विनंती त्यांनी साफ धुडकावून लावली. राज्यसूत्रे हाती घेतल्यानंतर हजरत पैगंबरांचा इतमाम कसा होता? असे कुणी विचारले तर खजुराच्या पानांनी आच्छादलेली व मातीच्या भिंतींनी वेष्टिलेली झोपडी हाच त्यांचा राजवाडा. डोक्यास गुंडाळलेला साधा फेटा हाच त्यांचा राजमुकुट व दाराशी बांधलेले उंट हाच त्यांच्या शरीर रक्षकांचा तांडा, असे सांगता येईल. यापेक्षा उपभोगशून्य स्वामी कोणता असू शकणार? फुकाचा दावा करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी हजरत महंमद पैगंबरांचे चरित्र वाचले पाहिजे.
(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
इफ्तार : ६.५४ (शुक्रवारी सायंकाळी)
सहेरी : ५.१५ (शनिवारी सकाळी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com