Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात सात मार्गांवरील वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
Pune News : पुणे जिल्ह्यासह शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत एकूण चार जण मृत्यू पावले आहेत. तर दरड कोसळणे, पुलावरून पाणी जाणे अशा विविध घटनांमुळे दोन राज्य मार्ग आणि सात जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
पुणे शहरातील पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्यांसोबत लष्कराच्या पाच तुकड्या पाचारण करून नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४८ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता (रेड अलर्ट) व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने निर्माण होणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण केली आहे, असेही ते म्हणाले.
खडकवासला धरणसाखळी परिसरात जोरदार पाऊस सुरू असून धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग या पुढील काळात परिस्थिती विचारात घेऊन कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांतील तसेच पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सरकारी कार्यालये वगळता खासगी कार्यालये, आस्थापना, संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले.
वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग
- राज्यमार्ग (१०३) ः खेड तालुक्यातील उरण-पनवेल-भोरगिरी-वाडा, खेड-पाबळ-शिरूर रस्त्यावर दरड कोसळली आहे
- राज्यमार्ग (१३३) ः मावळ तालुक्यातील खडकवासला-डोणजे-खानापूर-पाबे रस्ता पुलावरून पाणी वाहत आहे
- जिल्हा मार्ग : सोमाटणे-शिरगाव-दारुंब्रे-कासारसाई-पाचाणे-पुसाणे-ओव्हळे रस्ता पुलावरून पाणी वाहत आहे
- जिल्हा मार्ग : वडगाव-कातवी-वराळे-माळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५५ ला जोडणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत आहे
- जिल्हा मार्ग : अैंढे-देवळ-पाटण-बोरज-पाथरगाव रस्त्यावरून पाणी वाहत आहे
- जिल्हा मार्ग : कामशेत-नाणे-गोवित्री-थोरण-जांभवली-कोंडेश्वर रस्त्यावरून पाणी वाहत आहे
- जिल्हा मार्ग : एकवीरा देवी पायथा मंदिर ते कार्ला-मळवली-भाजे-लोहगड ते जिल्हा मार्ग २६ ला जोडणारा मार्ग पर्यायी वाहतूक वळविल्याने बंद
पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद
भोर, मावळ, मुळशी आणि इतर तालुक्यांमध्ये पर्यटनासाठी मोठी गर्दी होत असते. त्या अनुषंगाने प्रांत, तहसीलदार, तलाठी आणि पर्यटन विभागाच्या स्थानिक प्रशासनाला कारवाईचा आदेश दिला आहे. विशेषतः पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.