नवीन टर्मिनलला जून पर्यंतचा ''अवकाश''

नवीन टर्मिनलला जून पर्यंतचा ''अवकाश''

नवीन टर्मिनलला जूनपर्यंत ‘अवकाश’
मतमोजणीनंतरच ‘सीआयएसएफ’चे पथक दाखल होणार
पुणे, ता. ११ ः पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर टायर किलर व हायड्रॉलिक बोलार्ड बसविल्यानंतर आता विमानतळ प्रशासन ‘बिकास’कडून मंजुरीच्या औपचारिक घोषणेची प्रतिक्षा करीत आहे. नवीन टर्मिनलसाठी ‘सीआयएसएफ’चे (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) २३० जवानांचे पथक दिल्लीहून येणे अपेक्षित आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच हे पथक पुणे विमानतळाच्या सुरक्षेसाठी पाठविण्यात येईल. ते आल्यानंतरच नवीन टर्मिनल प्रवासी सेवेसाठी सुरु होईल.
नवीन टर्मिनलची चार वेळा पाहणी केल्यावर ‘बिकास’ने (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) एप्रिलअखेरीस प्रवासी वाहतुकीची मंजुरी दिली. त्यापूर्वी प्रवासी सुरक्षेसाठी दोन महत्त्वाची कामे करण्यास विमानतळ प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नवीन टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर व बाहेर पडण्याच्या ठिकाणी टायर किलर व हायड्रॉलिक बोलार्ड बसविण्यात आले आहेत. यामुळे विमानतळामध्ये कोणतेही वाहन जबरदस्तीने घुसण्याचा किंवा बाहेर पडण्याचा धोका टळेल. असे वाहन काही सेकंदात रोखणे त्यामुळे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा आणखी मजबूत होईल.
‘फ्लोअर प्लॅन’ तयार
नवीन टर्मिनलवर खाद्यपदार्थ, तयार कपडे आदींची दुकाने सुरु होणार आहेत. त्यासाठी विमानतळ प्रशासनाने फ्लोअर प्लॅन तयार केला असून अंतिम मंजुरीसाठी तो ‘बिकास’कडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यावर व अतिरिक्त जवानांची नियुक्ती झाल्यावरच नवीन टर्मिनल सुरु होईल. मंजुरीनंतर किमान १० दिवसांत टर्मिनल सुरु होईल. जून महिन्यातच टर्मिनल सुरु होणार आहे.
------------
‘सीआयएसएफ’च्या जवानांची संख्या ७८० होणार
जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’चे ४५० जवान तैनात आहेत. नवीन टर्मिनल मोठे असल्याने विमाने व प्रवाशांची संख्या वाढेल. हे लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने जवानांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र सध्या देशात सार्वत्रिक निवडणूका सुरु असल्याने काही जवानांची अतिसंवेदनशील ठिकाणी, तर काहींची नवीन संसदेच्या परिसरात नियुक्ती झाली आहे. मतमोजणीनंतरच २३० अतिरिक्त जवान पुण्यात दाखल होतील. जवानांची संख्या वाढल्यास चेकइन, सेक्युरिटी चेकइन, सारखे कामे अधिक वेगाने होतील.
---------------
‘बिकास’ने मंजुरीसाठी ज्या सूचना दिल्या होत्या, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. ‘फ्लोअर प्लॅन’व ‘सीआयएसएफ’ची नियुक्ती झाल्यावरच नवीन टर्मिनल प्रवासी सेवेत दाखल होईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com