वीजग्राहकांच्या मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट

वीजग्राहकांच्या मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट

पुणे, ता. १० : महावितरणने आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅटबॉट महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना यावरून प्रश्न विचारता येणार आहेत. तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती देखील घेता येणार आहे.
महावितरणच्या वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅटबॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे.
राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅटबॉट www.mahadiscom.in ही वेबसाइट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. महावितरणच्या वीजसेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या चॅट बॉटमधूनच मिळणार आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅटबॉटद्वारे उपलब्ध आहे.
वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी यापुढे महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमिट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅटबॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे.

असा आहे फायदा
नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्काचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅटबॉट थेट मदत करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com