...आणि ‘भाई‘ संतापले!

...आणि ‘भाई‘ संतापले!

गमतीदार किस्सा

...आणि ‘भाई‘ संतापले!
२००९ या वर्षी लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू होता. त्यावेळी काँग्रेसकडून सुरेश कलमाडी निवडणूक लढवत होते. ‘भाई’ म्हणून परिचित असलेले कलमाडी हे स्वतःच त्यावेळी निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची मिटींग ‘कलमाडी हाऊस’ या कलमाडी यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती. त्यावेळी मिटींगसाठी दत्ता गायकवाड, रमेश बागवे अशी प्रमुख मंडळी आवर्जून आली. प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांची यादी आमदार चंद्रकांत छाजेड यांच्याकडे होती. त्यामुळे कलमाडी यांनी छाजेड यांना बोलाविण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी छाजेड यांना फोन केला, तेव्हा ‘‘आपण १५ मिनिटात पोहचतो,’’ असे छाजेड यांनी सांगितले. त्यानंतर २० मिनीटे झाली, अर्धा तास झाला, एक तास झाला तरीही छाजेड काही येईनात. इकडे कलमाडी यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला. तब्बल दीड तासानंतर छाजेड ‘कलमाडी हाऊस’वर दाखल झाले. ‘‘इतका वेळ तुम्ही कुठे होतात?’’ असा प्रश्‍न कलमाडी यांनी विचारला, तेव्हा छाजेड यांनी ‘‘तुमचा फोन आला, तेव्हा आपण नगरहून निघालो होतो,’’ असे खरे सांगून टाकले. अगोदरच भडकलेल्या कलमाडी यांनी ‘‘तुम्हाला उशीर होणार आहे, हे सांगितले असते तर आम्ही मिटींग सुरू केली नसती का?’’ अशा शब्दांत राग व्यक्त करीत शेवटी मिटींग सुरू केली. ‘भाईं’चा तो संताप तिथे बसलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही चांगलाच अनुभवला. ‘भाईं’च्या रागाची त्यादिवशी चांगलीच चर्चा रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com