जुन्या टर्मिनलचे रूपडे पालटणार

जुन्या टर्मिनलचे रूपडे पालटणार

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे रूपडे पालटणार आहे. जुन्या टर्मिनलच्या ‘आगमन’चे रूपांतर ‘निर्गमन’ गेट मध्ये केले जाणार आहे. हे करीत असताना पूर्वीचे चार बॅगेज बेल्ट काढून टाकण्यात येईल. तसेच प्रवासी सुविधा आणखी चांगली करण्यासाठी अतिरिक्त १६ चेक इन काउंटर, पाच एक्सरे मशिनसह प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन सिक्युरिटी होल्ड एरिया देखील तयार केला जाणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून पुणे विमानतळ प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. जून महिन्यात जुन्या टर्मिनलच्या कामास सुरुवात होणार आहे.

नवीन टर्मिनल जूनमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी खुले होत आहे. नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी खुले होताच जुन्या टर्मिनलमधील कामास सुरुवात होईल. नवीन टर्मिनलवरुन वर्षात सुमारे एक कोटींपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीचा अंदाज आहे. जुन्या टर्मिनलच्या तुलनेत ही संख्या १० लाख इतकी जास्त आहे. प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाने देखील प्रवासीसुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. चेक इन काउंटरची संख्या वाढणार असल्याने व अतिरिक्त सिक्युरिटी होल्ड एरिया तयार होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन टर्मिनल ३४ चेक इन काउंटर आहेत. जुन्यात देखील १६ चेक इन काउंटर असणार असल्याने विमानतळावर एकूण ५० चेक इन काउंटर असतील. त्यामुळे प्रवाशांच्या रांगा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

आठ महिन्यांचा कालावधी लागणार
जुन्या टर्मिनलवर पहिल्या टप्प्यात चेक इन काउंटरचे काम केले जाईल. मात्र पहिल्या मजल्यावर सिक्युरिटी होल्ड एरिया करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाने सहा ते आठ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे काम करीत असतानाच टर्मिनलसमोरील मोकळ्या जागेत असलेले विविध कार्यालयांच्या इमारती पाडून समोरचा भाग मोकळा करण्यात येणार आहे.

‘कस्स किऑस्क’ची संख्या वाढविणे गरजेचे
टर्मिनलवर प्रवाशांना दोन पद्धतीने बोर्डिंग पास मिळतो. यात क्युट काउंटर व कस्स किऑस्कचा समावेश आहे. क्युट (कॉमन युझर टर्मिनल इक्यूपमेंट) यालाच चेक इन काउंटर असे म्हणतात. क्युट काउंटरवर प्रवाशांना विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून बोर्डिंग पास दिला जातो. ज्यांच्याकडे चेक इन बॅगेज असतात असे प्रवासी क्युट काउंटरचा वापर करतात. ज्यांच्याकडे चेक इन बॅगेज नसते असे प्रवासी ‘कस्स’ (कॉमन युझर्स सेल्फ सर्व्हिस) किऑस्क’चा वापर करून स्वतःच बोर्डिंग पास काढतात. यात प्रवासी आपला पीएनआर क्रमांक टाकतो आणि त्याला बोर्डिंग पास मिळतो. अशा पद्धतीने बोर्डिंग पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त आहे. तेव्हा नवीन टर्मिनलवर ‘कस्स किऑस्क’ची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

जुन्या टर्मिनलमध्ये विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. जून महिन्यात कामाला सुरुवात होईल. यात चेक इन काउंटरची संख्या वाढविणे, एक्स रे मशिनची संख्या वाढविणे आदींचा समावेश आहे.
संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com