वाहतूक कोंडी दूर करा, आनंदाने जगू द्या !

वाहतूक कोंडी दूर करा, आनंदाने जगू द्या !

पुणे, ता. १२ : पुण्यातील मेट्रोचा विस्तार गतीने करावा, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रस्ते मोठा करा, त्यांची लांबी वाढवा, पादचारी मार्ग अतिक्रमण मुक्त करा. वाहतूक कोंडी दूर केली तरच पुणेकरांना आनंदाने जगता येईल. विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर टीका करून त्यातून काही साध्य होणार नाही, अशी अपेक्षा मतदारांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासने ‘सकाळ’ने प्रकाशित केली. त्यावर नागरिकांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत.

पुण्याच्या भावी खासदारांनी मेट्रोची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. रखडलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होत आहे. विशेषतः शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गाचे मेट्रोचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
- भूषण गोरे

खासदारांनी सरकारी पैसा जपून खर्च करावा, कामे करताना नागरीकांना विश्वासात घ्यावे. उगीचच देखावा म्हणून वाट्टेल ती कामे करू नयेत, दुरुस्तीच्या नावाखाली परत-परत कामे करू नये. शहराची लोकसंख्या पुढील २५ वर्षांत किती होईल, ते धोरण ठेऊन राबवावे.
- ज्ञानेश्‍वर जगताप

सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्यात व्यग्र आहेत. शहराच्या वाढीवर कोणतेही नियंत्रण नाही. विकास आराखड्याची मुदत वाढवून घेण्यासाठी लगेच वेळ मिळतो; पण विकास आराखडा मंजुरीसाठी वेळ मिळत नाही.’
- अमर भोगील

पुणेकरांचे जीवनमान उंचाविण्यासाठी खासदाराने केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रभावीपणे बाजू मांडावी, धोरणे ठरवावीत आणि निधी आणावा. शहरासाठी पुरेसे पाणी आणि कार्यक्षम, शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे. वारसास्थळे म्हणून टेकड्यांचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी व बाजू मांडावी.
- धोंडपा नंदे

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा खासदार पाहिजे. तोडफोड होणारे प्रकल्प शहरात नकोत, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन असले पाहिजे. प्रशासनाशी समन्वय आवश्यक. तसेच खासदाराने जनतेसाठी एक ठराविक वेळ राखून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागांत ‘खासदार संवाद’ राबवला पाहिजे, जेणेकरून आम्हा नागरिकांना खासदारांशी थेट संवाद साधता आला पाहिजे.
- विनायक फडतरे

महात्मा फुले मंडई येथील तंबाखू अळी (बाबू गेनू चौक) येथे दुकानदारांनी पूर्ण रस्ता अतिक्रमण करून ठेवला आहे. नागरिकांना येण्या-जाण्यास त्रास होतो. तरी आपण योग्य ती कारवाई करावी.
- नागरिक

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या प्रचंड गंभीर झालेली आहे. दंडात्मक कारवाई करण्याऐवजी शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पार्किंगची व्यवस्था निर्माण करून द्यावी, रस्त्याची स्थिती सुधारावी.’’
- नागरिक

वाहतुकीची फार मोठी समस्या असून रिंग रोड, नदी पात्रातील रस्त्याची कामे पूर्ण करावीत. अवजड वाहनांना रात्री बाराच्या पुढे परवानगी द्यावी. पहाटे सहावाजेपर्यंत शहरात येण्याची परवानगी द्यावी. दिवसा अवजड वाहनांना शहरात बंदी घाला.
- नागरिक

मतदार म्हणतात...
- वाहतूक कोंडी नित्याची; पण अजून उत्तर सापडले नाही.
- शहराचा विकास केवळ बांधकामांपुरता मर्यादित आहे की काय?, त्यामुळेच बकालपणा वाढला आहे.
- वाहतुकीचे नियोजन करताना नागरिक केंद्रित नियोजन केले पाहिजे. वाहनांना प्राधान्य नको
- रस्ते खूप अरुंद आहेत, ते मोठे करावेत. अर्धवट रस्ते करू नयेत.
- झोपडपट्टी वाढत असून, आमदार व खासदारांनी त्याला अभय देऊ नये.
- लोकांनी वाहतुकीची शिस्त पाळायला हवी, त्यासाठी दर आठवड्याला, महिन्याला कार्यशाळा घ्याव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com