पहिलं वहिलं!

पहिलं वहिलं!

पुणे, ता. १३ ः आयुष्यातील पहिलेच मतदान, ते देखील थेट लोकसभा निवडणुकीचे असल्यामुळे उत्सुकता, सकाळीच घराबाहेर पडत केलेले मतदान आणि मग समाजमाध्यमांवर टाकलेली छायाचित्रे...अशा उत्साही वातावरणात सोमवारी पुण्यातील नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मुला-मुलींनी मतदानाच्या काही दिवसांपूर्वीच मतदार यादीतील आपले नाव तपासून घेतले होते. कोणत्या केंद्रावर आपले मतदान आहे, याची माहिती घेतली होती. अनेकांनी सकाळी लवकरच मतदान करण्यास प्राधान्य दिले. ‘मतदानामुळे देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी झाल्याची भावना निर्माण झाली असून महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे समाधान आहे’, अशी प्रतिक्रिया नवमतदारांनी व्यक्त केली.

मतदान केल्यानंतर आपणही एक जबाबदार नागरिक असल्याची भावना निर्माण झाली आहे. आपले नेतृत्व कोण करणार, हे ठरवण्याची संधी आपल्याला मतदानामुळेच मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून मतदान करावे, असे माझे आवाहन आहे.
- आयुश्री पंडित

मतदान हे आपले महत्त्वाचे आणि मौलिक कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी आणि लोकशाहीसाठी मतदान करायलाच हवे.
- कनिष्क हिरवे

मतदान म्हणजे एक जबाबदारी आहे. मतदानाला जाण्यापूर्वी मी आई-बाबांकडून याबद्दल नीट माहिती घेतली होती. निवडून आलेल्या उमेदवाराने विद्यार्थ्यांसाठी काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे.
- अवनी वैद्य

मतदान करण्यापूर्वी सुरुवातीला भीती वाटत होती. पण मतदान केल्यानंतर चांगले वाटते आहे. प्रत्येकाने आपले हे कर्तव्य बजावायलाच हवे.
- रेश्मा पटेल

यंदा माझे पहिलेच मतदान होते. पहिल्यांदा थोडी भीती वाटली, त्यात गर्दी पाहून थोडेसे दडपण आले. पण नंतर आपण एक मोठी जबाबदारी पार पाडत आहोत, या भावनेने छान वाटले.
- पौरवी पटवर्धन

आपण निवडून दिलेला उमेदवारच आपल्या भविष्याचे निर्णय घेत असतात. त्यामुळे जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे. मी देखील आज याच भावनेतून पहिल्यांदा मतदान केले.
- प्रियांका कडदेकर

पहिल्यांदाच मतदान करण्याचा क्षण माझ्यासाठी उत्साहाने भारलेला होता. मतदानाची सर्व प्रक्रिया अतिशय सुलभ होती आणि मतदान केंद्रावरील सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
- सई पाठक

सुदृढ लोकशाहीसाठी प्रथमच मतदान करते आहे. यामुळे एक वेगळा अनुभव मिळाला. अनेक वर्षे आई-बाबा मतदानाला जात असताना त्यांच्यासह अनेक वेळा गेले. पण मी स्वतः मतदान केल्यामुळे देशाचे नेतृत्व निवडण्यात माझा हातभार लागल्याचा आनंद आहे.
- चैत्राली तुळजापूरकर

पहिले मतदान करताना सरकारी यंत्रणेचा अनुभव घेतला. माझे पहिले मत देशासाठीच्या निवडणुकीचे आहे, याचा मला आनंद आहे.
- पारस मारणे

निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा सण असून सगळ्यांनी मतदान करून तो सण साजरा केला पाहिजे. देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या विकासासाठी आपले एक मत खूप गरजेचे आहे.
- सुयश गाडगीळ

मी यंदा पहिल्यांदाच मतदान केल्यामुळे चांगले वाटते आहे. चांगली व्यक्ती निवडून यावी आणि शहराचा विकास व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
- रोहित मारणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com