मतदारांमध्ये उत्साह

मतदारांमध्ये उत्साह

पुणे,ता. १३ : मतदार यादीतून नावे गायब होणे...मतदान केंद्र बदलल्यामुळे झालेला घोळ...बोगस मतदानाचा प्रकार, मतदानासाठी होणारा विलंब आणि त्यामुळे मतदान न करताच अनेक मतदार परत गेल्याचे चित्र सहाही विधानसभा मतदार संघात काही प्रमाणात सोमवारी पाहावयास मिळाले. एकीकडे मतदानासाठी मतदार राजा उत्साही दिसून आला, तरी दुसरीकडे मात्र प्रशासनच निरुत्साही असल्याची परिस्थिती आज दिवसभर होती. मशिन बंद पडणे, राजकीय पक्षातील किरकोळ वाद वगळता पुणे शहर लोकसभा मतदार संघात सुमारे ५४ टक्के मतदान झाले.
चौथ्या टप्प्यातील पुण्यासह शिरूर आणि मावळ या तिन्ही लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान झाले. सकाळी सात वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पुणे शहरातील पेठा आणि उपनगरमधील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात झालेल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा पॅटर्न आज या तिन्ही मतदार संघात पाहावयास मिळाला. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा ते साडेबारापर्यंत ही शहराच्या सर्वच विधानसभा मतदार संघात केंद्रांवर होती.
गेले दोन दिवस शहरातील ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज सकाळपासून निरभ्र आकाश आणि उन्हाचा चटका जाणवत होता. असे असतानाही मतदारांनी केंद्रांवर रांगा लावून मतदान करीत होती. उन्हापासून मतदारांचा बचाव करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अनेक केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या.

मतदार यादीतून नावे गायब
शहराच्या सहाही विधानसभा मतदार संघातील नागरिकांना यंदाच्या ही निवडणुकीत मतदार यादीतून नावे वगळण्यात आली असल्याचा अनुभव मोठ्या प्रमाणावर आला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत नाव नसल्यामुळे परत जावे लागले. परिणामी शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार सहाय्यता कक्षातील अधिकाऱ्यांशी नागरिक हुज्जत घालत असल्याचे दृश्‍य सगळीकडेच दिसत होते.

बोगस मतदानाचेही प्रकार उघड
कॉंगेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या प्रमाणावर अनेकांना मतदारांना मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांच्या नावावर दुसरेच कोणीतरी मतदान करून गेले असल्याचा अनुभव आला. कोथरूड परिसरात एका नवमतदार युवतीलादेखील बोगस मतदानाचा फटका बसला. त्यावर पर्याय म्हणून काही ठिकाणी मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी अशा मतदारांकडून १७ नंबरचा फॉर्म भरून घेऊन बॅलेट पेपरवर त्यांचे मतदान करून घेतले. मात्र काही ठिकाणी अशा मतदारांना मतदान न करताच घरी जावे लागले.

संथ गतीने मतदान
संथ गतीने मतदान सुरू असल्यामुळे अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान करण्यासाठी काही केंद्रांवर एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागले, अशा तक्रारी मतदारांनी केल्या. तर मतदानाच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे नाना पेठे, प्रभात रोड, भांडारकर रस्ता, रविवार पेठेतील मतदान न करताच मतदार घरी गेले. त्यावरून काही ठिकाणी मतदार आणि अधिकारी यांच्या बाचाबाचीचे प्रकारही घडले. एकीकडे मतदानासाठी होणारा विलंब आणि दुसरीकडे पिण्याचे पाणी, बसण्याची सोय आणि सावलीसाठी मंडप नसल्यामुळे देखील काही मतदारांनी मतदान न करता परत गेल्याचे पहावयास मिळाले नाही. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, असा आरोप राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

मतदान केंद्रातील बदलामुळे गोंधळ
मतदारांची संख्या वाढल्याने यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मतदार केंद्रांच्या जागेत फेरबदल केला. त्याचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागला. तर काही
मतदार सवयीप्रमाणे जुन्याच केंद्रांवर गेल्यानंतर त्यांना आपले नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर असल्याचे कळाले. त्यामुळे अनेक मतदारांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी आल्या. परिणाम मतदानावर झाला. एकाच कुटुंबातील नागरिकांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आली, अशाही तक्रारी नागरिकांनी केल्या. तर काही मतदारांचे मतदान केंद्र ही घरापासून लांबच्या अंतरावर गेल्यामुळे त्याचाही फटका बसला.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com