‘इव्हीएम’ बंद पडल्याने 
मतदार संतप्त, दीड तास रांगेत

‘इव्हीएम’ बंद पडल्याने मतदार संतप्त, दीड तास रांगेत

मतदानासाठी तास-दीड तास थांबलेला मतदार, काही मतदान केंद्रांवर बंद पडलेल्या ‘इव्हीएम’ मशिन आणि मतदार यादीतून नाव नसल्याने संतप्त झालेले नागरिक असे चित्र कसबा विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी दिसत होते.
कसबा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून लांबच लांब रांग लागल्या असल्याचे चित्र दिसत होते. याबाबत गोगटे प्रशालेत मतदानासाठी आलेले हेमंत अग्निहोत्री म्हणाले, “सकाळी साडेसात वाजता माझ्यापुढे रांगेत ४२ जण होते. मतदान करण्यासाठी मला दोन तास रांगेत थांबावे लागले.” सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, पूर्व भागातील सोमवार, रविवार, गणेश पेठ या भागातही सकाळी नऊ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने मतदार रांगेत होते. बहुतांश नागरिक हे सुशिक्षित, नोकरदार, स्वतःचा व्यवसाय असलेले असे होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यातही तरुणांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट दिसत होते. बहुतांश मतदार दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून मतदान केंद्रावर येत होते. येणाऱ्या प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाइल फोन होता.
कसब्याच्या वेगवेगळ्या भागांत मतदान सुरळीत सुरू असतानाच सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाचे चिन्ह आणि उमेदवाराचे छायाचित्र असलेले बॅनर मतदान केंद्राजवळ लावले होते, हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्रावरील गर्दी कायम होती. एक वाजेपर्यंत ३१.१० टक्के मतदान झाले होते.
सदाशिव पेठेतील सुंदरबाई राठी प्रशाला मतदान केंद्रावर आलेल्या रजनी पेंडसे म्हणाल्या, “इतर मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांगा होत्या. या केंद्रावर स्त्री-पुरुष अशी एकच रांग केली आहे. त्यामुळे दीड तास रांगेत थांबून मतदान करावे लागले. ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने मतदान करवून घेतले जाणे, हे चांगले आहे. पण, माझ्यासारख्या मध्यमवयीन महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे. त्यांचाही विचार फक्त वयाच्या अटीत बसत नसल्याने होऊ शकला नाही.”
दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाल्याने पावसाच्या आत मतदान करण्यावर कसब्यातील नागरिकांनी भर दिला. त्यामुळे सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदान केंद्रावरील रांगा वाढल्या. विशेषतः पूर्व भागात याचे प्रमाण सर्वाधिक होते. याबद्दल हमीद शेख म्हणाले, “सकाळी कामावर गेलो होतो. दुपारनंतर मतदान करण्यासाठी आलो आहे. सकाळी रांगेत खूप गर्दी असल्याने दुपारी येऊन मतदान करावे, असा विचार केला. मात्र, सकाळपेक्षा जास्त रांग आत्ता दिसत आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com