कार्पोरेट रुग्णालयांना सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘संसर्ग’

कार्पोरेट रुग्णालयांना सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘संसर्ग’

पुणे, ता. १६ : रुग्णाच्या उपचाराचे बिल कमी करण्याचा आग्रह धरत राडा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा धर्मादाय रुग्णालयांना ‘संसर्ग’ झाला आहे. रुग्णालयात मोठ्या आवाजात अधिकाऱ्यांशी बोलणे, कर्मचाऱ्यांबरोबर सातत्याने वाद घालणे आणि वारंवार तक्रारीची धमकी देत वेठीस धरणाऱ्या ‘सामाजिक कार्यकर्त्यांची’ संख्या वाढली असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले.

शहरात ससूनसारखी सरकारी रुग्णालये, धर्मादाय न्यासाअंतर्गत नोंदणी झालेले आणि कार्पोरेट अशा तीन प्रकारांतील रुग्णालये आहेत. त्यातील सुमारे ८० टक्के रुग्णालये ही धर्मादाय न्यासाच्या अंतर्गत नोंदणी झालेली आहेत. शहराच्या परिघावर आता एकेक कार्पोरेट रुग्णालये वेगाने उभी राहात असल्याचे दिसते. सरकारी योजना, धर्मादाय रुग्णालयाचे नियम या रुग्णालयांना नसतात. अशा वेळी शहरातील धर्मादाय रुग्णालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, मात्र त्यांना सध्या ‘सामाजिक कार्यकर्ता’ या नावाखाली दडपशाही करणाऱ्यांच्या उपद्रवाने त्रस्त केले असल्याची वेगवेगळ्या धर्मादाय रुग्णालयांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आठ-दहा जण येतात. रुग्णालयामधील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना दमदाटी करतात. त्यांचा राग शांत करून, त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णाचा उपचार मोफत करा, त्यांच्या बिलामध्ये सवलत द्या, औषधाचे पैसे कमी करा अशा मागण्या पुढे येतात. रुग्णाची आर्थिक परिस्थिती, वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टीने रुग्णालय त्यांच्या मागण्या मान्य करते, पण हेच कार्यकर्ते दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना घेऊन पुन्हा रुग्णालयात राडा घालतात. अशा घटना शहरातील प्रमुख धर्मादाय रुग्णालयात सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------
पोलिसांनी ठोस पाऊल उचलावे
रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार देऊन त्याला बरे करणे, याला सर्व रुग्णालय प्राधान्य देतात. कारण, सध्या रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळत नाही. प्रतीक्षा यादीवर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा वेळी रुग्णसेवा देताना सामाजिक कार्यकर्त्यांचा उपद्रव वाढत आहे. काही रुग्णालयांनी थेट पोलिस ठाण्यांमध्ये अशा कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, पण त्यानंतर दुसरा कार्यकर्ता पुढे येतो, त्याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे धर्मादाय रुग्णसेवेला अशा कार्यकर्त्यांचा झालेला संसर्ग कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याची भावना रुग्णालयांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
..............
कवटीचा भाग हरविल्याचे पत्र
शहरातील एका रुग्णालयात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी कापण्यात आलेल्या कवटीचा भाग हरविल्याचे पत्र सामाजिक कार्यकर्त्याने पुढे आणले. सात महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची माहिती घेतल्यानंतर तो कवटीचा भाग पुन्हा बसविण्यात येणार नव्हता. त्याऐवजी धातूचा भाग बसविण्याची प्रक्रिया नियोजित केली होती, असे संबंधित रुग्णालयाने सांगितले. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये सक्रिय झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली आहे.
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com