

पुणे, ता. २१ : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार दहावी आणि बारावीची परीक्षा दोन सत्रांत घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी प्राथमिक चर्चा झाली आहे. याबाबत राज्य सरकारने अद्याप धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला नाही. परंतु येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत १५ ते २० दिवस आधी सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जूलै-ऑगस्टमधील पुरवणी परीक्षा जूनमध्येच घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्ही येत्या शैक्षणिक वर्षात (२०२४-२५) दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर आतापासूनच तयारीला लागा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीसाठी एक मुख्य आणि एक सुधारणा करण्यासाठी अशा दोनदा परीक्षा घेण्यास सुचविण्यात आले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत गोसावी म्हणाले,‘‘राज्य मंडळही प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीची एक मुख्य आणि एक पुरवणी परीक्षा अशी दोनदा परीक्षा घेते. मुख्य परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुरवणी परीक्षेत संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी मिळते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून येत्या वर्षात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणारी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात, तर दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात घेण्याचा विचार सुरू आहे.’’
याप्रमाणे परीक्षा झाल्यास बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुरवणी परीक्षा होईल आणि त्याचाही निकाल लगेचच जाहीर करण्याच्या नियोजनाबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
दरवर्षी सुमारे ३० लाखांहून जास्त विद्यार्थी राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा देतात. ही संख्या खूप मोठी आहे. अशावेळी बोर्डाची परीक्षा विभागून दोन सत्रांत घेणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षा काही दिवस अगोदर सुरू केल्यास, पुरवणी परीक्षेचेही नियोजन लवकर करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
.....
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई परीक्षा दोन सत्रांत होते. त्यामुळे विद्यार्थ्याला दोनदा संधी मिळते. सर्वाधिक गुण असलेल्या परीक्षेचे गुण जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी ग्राह्य धरले जातात. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून राज्य मंडळाच्या परीक्षेचे नियोजन करावे लागेल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.