

कचरावेचकांच्या पाल्यांचे
बारावीच्या परीक्षेत यश
पुणे, ता. २१ : पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवर कामगार असणाऱ्या शकुंतला जैस्वाल यांची कन्या करिना हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावीच्या परीक्षेत ८३.६७ टक्के गुण मिळवीत कौतुकास्पद यश संपादन केले आहे. करिनासह कचरावेचकांच्या मुलांनी सर्व अडथळे झुगारून बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
निगडी येथील करिनाचे पितृछत्र २०१२मध्ये हरपले. तिची मोठी बहिण नेहा टाटा मोटर्समध्ये गुणवत्ता विभागाच्या असेंब्ली लाइनवर काम करते. करिना म्हणते, ‘‘मी आनंदी आहे, पण प्रामाणिकपणे मेहनत केल्याने मला आणखी गुण मिळतील अशा अपेक्षा होत्या. मी पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचे. मला बीबीए करायचे आहे.’’
कामगार संघटना, कागद काच पत्र कष्टकरी पंचायतमधील सदस्यांच्या मुलांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. हडपसर येथील वैदूवाडीतील ज्योती पंडित या स्वच्छ संस्थेच्या सदस्या असून त्यांची कन्या अंकिता पंडित हिने बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून ७५ टक्के गुण मिळविले आहेत. तिने राष्ट्रीय स्तरावर योगासनांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय तिने नुकतीच सैन्यदलाची परीक्षा देखील दिली आहे. ती म्हणते, ‘‘माझी बहीण गेल्या महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाली आहे. माझेही स्वप्न भारतीय सैन्यात भरती होण्याचे आहे’’
ताडीवाला रस्ता येथील मेघना मोरे हिने वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असून तिला ७५.६ टक्के गुण मिळाले आहेत. तिला कंपनी सेक्रेटरी व्हायचे आहे. तर प्रतीक्षा पिंगळे हिने ७७.३ टक्के गुण (कला शाखा) मिळविले आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.